नागपूर दि. २६ मार्च : विदर्भातील ख्यातनाम कवयित्री, लेखिका व समाजसेविका, प्राद्यापक श्रीमती विमलताई गाडेकर यांचे आज मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवाशी आहेत.
चंद्रपूर व विदर्भातील अनेक सामाजिक व साहित्यिक चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता.आपल्या सामाजिक चळवळीतून त्यांनी अनेक कुटुंबांना उभे केले आहे. चंद्रपूर येथील जनता कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे काम केले आहे. अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. महिलांच्या समस्यांवर काम करणाऱ्या संयुक्त महिला मंचच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या.
त्यांचे 'ऋतुबंध ', 'रमाईच्या जीवनावरील चंदनी दरवळ ' प्रातिनिधिक काव्यसंग्रह 'गुलमोहर ', प्रसिद्ध असून 'पार्टी ' कथा संग्रह देखील प्रसिद्ध आहे. अनेक वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. विदर्भ साहित्य संघ व अनेक साहित्य संघटनांची देखील त्यांचा नजीकचा संबंध होता.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती अभियंते भगवान गाडेकर, मुलगा डॉ. हेमंत गाडेकर, अभिनेता जयंत गाडेकर, मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर -गाडेकर, डाॅ. मोना पंकज व बराच मोठा आप्तपरिवार आहे.