नागपूर, ता ९ ः सतत ३२४ तास तबला वादन करून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी ठरलेले येथील ज्योतीषाचार्य डॉ. प्रशांत गायकवाड यांना नुकताच आंतरराष्ट्रीय एशिया प्राईड बुक अवॉर्ड २०२१ मिळाला. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एका समारंभात त्यांना गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय मानवता मिशन, नीती आयोग आणि डिजिटल भारत सरकारकडून नोंदणीकृत संस्था आंतरराष्ट्रीय मानवता मिशन या संस्थेने त्यांच्या आजवरच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित केले. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कलावंत राजीव वर्मा यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या सोहळ्याला प्रतिभा वायकर, शुभम विद्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ४७ देशांमधील कलावंतांना कला, संगीत आणि संस्कृतीचे धडे देण्याचा विक्रमही डॉ. गायकवाड यांच्या नावावर आहे. निर्भया बेटी सुरक्षा अभियानाचे ते ब्रॅन्ड ॲम्बेसेडर आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मोदी रत्न पुरस्कारनेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राम मेघवाल आणि प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांनी त्यांना गेल्या वर्षी गौरविले आहे. भविष्यातही साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणार असल्याचा मानस डॉ. गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.