Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १३, २०२१

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय होणार - सुनील केदार

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात

फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय होणार - सुनील केदार




नागपूर, दि.13 : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात 2022 पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी आज येथे सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात 15 फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात आज हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पश व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी यावेळी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरु करुन नवीन पर्वाला आज प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती आज पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरु होणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरु करत असून अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, 1962 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहचणार असून, ‘शासन आपल्या दारी योजना सुरु होत असल्याचे समाधान श्री. केदार यांनी व्यक्त केले.   

असा होणार शेतकऱ्यांना फायदा

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गंत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालायांच्या माध्यमातून आता थेट आजारी पशुरुग्णांवर शेतक-यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण करता येणार आहे.  तसेच उच्च उत्पादक क्षमता असणा-या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय शेतक-यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच शेतक-यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था उपलब्ध करुन देणार असून शासनाच्या विविध योजनांची माहितीसुद्धा हे पथक देणार असल्याचे श्री. केदार म्हणाले.

 

 

 

बर्ड फ्ल्यूपेक्षा अफवांमुळे जास्त नुकसान

            राज्यात बर्ड फ्ल्यू आटोक्यात आला असूनबर्ड फ्ल्यूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाहीअसे सांगून श्री. केदार यांनी एका पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यास 48 तासात त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र  त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. भारतीय खाद्यसंस्कृती ही जगात सर्वाधिक सुरक्षित असूनपूर्णत: शिजविलेले चिकन बिनधास्त खाण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच मांसाहारी नागरिकांमधील भिती काढून टाकण्यासाठी त्यांनी नुकतेच चिकन फेस्टीव्हलचे आयोजन केले होतेयाची माहितीही त्यांनी दिली. कुक्कुटपान करणाऱ्या व्यावसायिकांना नाममात्र दरात पक्ष्यांचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.