शहीद स्मारकाचे अनधिकृत उद्घाटन; स्मारकात नेत्यांचे फोटो लावले
शहिदांचा अपमान करणाऱ्या महापौर व उपमहापौर यांचे विरूध्द आयुक्तांनी कारवाई करावी- पप्पू देशमुख यांची मागणी
चंद्रपूर : आमदार-खासदार निधीची कामे तसेच इतर शासकीय उद्घाटने-भूमिपूजन अशा कार्यक्रमाच्या वेळी पक्षाचे चिन्ह असलेली पत्रिका छापून व्यक्तिगत पातळीवर सर्वसामान्य लोकांमध्ये वाटप करण्याची हास्यास्पद प्रथा भाजपच्या काही हौशी कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे. कोरोना आपत्तीमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या निधीतून पक्षाच्या नावाने जेवनाचे डब्बे वाटप केल्यानंतर आता चक्क हुतात्मा स्मारकाचे अनधिकृत उद्घाटन करून व स्मारकात नेत्यांचे फोटो लावून मनपातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहिदांचा अपमान केला असा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.
चंद्रपूर शहरामध्ये नागपूर महामार्गावर असलेल्या हुतात्मा स्मारक(शहीद स्मारका)चे नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले.नूतनीकरण झाल्यानंतर या स्मारकाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी गणराज्य दिनानिमित्त करण्यात आले. या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार , उपमहापौर राहुल पावडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. मात्र या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये मनपा प्रशासनाचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. आयुक्त-उपायुक्त या अधिकाऱ्यांची नावे सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी लागलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या फलकावर लावण्यात आले नव्हते. सर्व प्रकारचे शिष्टाचार डावलून कार्यक्रम घेण्यात आल्याने वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कार्यक्रमाबाबत मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांना मोबाईलवर काॅल करून विचारणा केली. आयुक्त मोहिते यांनी प्रशासनाने कार्यक्रम आयोजीत केलेला नसल्याची माहिती दिल्यानंतर देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता जाधव यांना सुद्धा मोबाईल वरून माहिती विचारली.मात्र महानगर पालिका किंवा बांधकाम विभागाने उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले नसल्याची मौखिक माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक देशमुख यांनी लेखी पत्र देऊन आयुक्त मोहिते यांना या कार्यक्रमाबद्दल विचारणा केली. हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन मनपाने केले नसल्याचे मनपा आयुक्तांनी देशमुख यांना लेखी कळविले.
हुतात्मा स्मारक (शहीद स्मारका)चे उद्घाटन भाजपने अप्रत्यक्षपणे पक्षाच्या बॅनरखाली केल्याचे सिद्ध झाले. महापौर राखी कंचर्लावार व उपमहापौर राहुल पावडे यांनी मनपाच्या वास्तूचे अनधिकृतपणे उद्घाटन केले. हुतात्मा स्मारकाच्या आतमध्ये नेत्यांचे फोटो अनधिकृतपणे लावले.भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी शहिदांचा अपमान केला त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आयुक्तांनी कठोर कारवाई करावी,अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.