विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन करा
📌 माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी
नागपूर - कोविड १९ च्या गडद छायेत १० व १२ वी च्या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अपूर्ण अभ्यासक्रम व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. निकालानंतर होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन केंद्र सुरु करावे अशी मागणी माजी शिक्षण मंडळ सदस्य व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय शिक्षण मंडळाला करण्यात आली.
विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सौ माधुरी सावरकर यांना निवेदन देण्यात आले. यात कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर शाळा बंद होत्या. आॅनलाईनच्या माध्यमातून देण्यात आलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या विकासात्मक भुमिकेला पोषक ठरले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी यावर्षी ड्राप आऊट चा पर्याय निवडत आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून नव्या सामाजिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आलेले नैराश्य टाळण्यासाठी व त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात परिक्षेसाठी तयार करणे आवश्यक आहे. याकरिता विभागीय शिक्षण मंडळामार्फत प्रत्येक तालुकानिहाय किमान १० शिक्षकांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करुन त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक शाळेत १० वी व १२ वी च्या परिक्षेचे केंद्र देण्यात यावे, परिक्षेचे फाॅर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली अशी मागणी करण्यात आली. नागपूर विभागीय शिक्षण मंडळ विद्यार्थी हितार्थ निर्णय घेऊन या विषयावर कार्यवाही करेल असे आश्वासन शिक्षण मंडळाच्या सचिव सौ माधुरी सावरकर यांनी दिले. यावेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री राजू हारगुडे, उच्च माध्यमिक संघटक श्री कमलेश सहारे उपस्थित होते.