कन्नमवार यांच्या नावाचे विद्रूपीकरण करणा-या समाजकंटकांवर कार्यवाही करा
📌 राज्यभर निषेध व निवेदन सादर
नागपूर- पोभूर्णा तालुक्यात ठाणेदाराच्या राजाश्रयाखाली स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या नावाचे विद्रूपीकरण करणा-या समाजकंटकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती नागपूर तर्फे करण्यात आली.
या संदर्भात आज (ता २८) नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्य़ातील पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर गट ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर दीक्षित या गावात २५ नोव्हेंबर २०१९ रोजी ग्रामसभेत ठराव मंजूर करून गावातील नवीन सभागृहाला स्व.दादासाहेब कन्नमवार सभागृह देण्याचे ठरले. त्यानुसार गावातील कार्यकर्त्यांनी तसे सभागृहाला नाव दिले .परंतु काही समाजकंटकांनी तब्बल दिड वर्षानंतर विरोध करीत हे प्रकरण पोभूर्णा ठाण्यात नेले. यावेळी पोभूर्णा ठाणेदाराने ग्रामसभेच्या ठरावाला आक्षेप घेत
सभागृहावरील दादासाहेब कन्नमवार यांचे नाव बदलण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. काही समाजकंटकांना हाताशी घेत त्यांना राजाश्रय देत २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्य संग्राम सैनिक व माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे नाव पुसून विद्रूपीकरण केले. या घटनेमुळे राज्यभरातील दादासाहेब कन्नमवार समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेला दोषी असलेल्या समाज कंटकावर तसेच राजाश्रय देणा-या पोभूर्णा ठाणेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टंडळात
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समिती नागपूरचे संघटक दीनानाथ वाघमारे, खिमेश बढिये, अर्चना कोट्टेवार, मुकुंद अडेवार, विनोद आकुलवार, लक्ष्मण पोटे, कमलेश सहारे उपस्थित होते