दिल्लीच्या जेएनयूचे विद्यार्थी, विदेशात उच्च शिक्षण, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, एल्गार प्रतिष्ठान चे महासचिव डॉक्टर कल्याण कुमार नयन हे चितेगाव (तालुका मूल) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य बनले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांचे पती आहेत.
डॉ. कल्याण कुमार यांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जवाहरलाला नेहरू विद्यापीठातून पीएचडी पदवी, अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते मागील काही वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेविका एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्याशी विवाह केल्यानंतर ते चंद्रपूर जिल्ह्यात समाजकार्यात सहभागी झाले होते. एल्गार प्रतिष्ठान आणि श्रमिक एल्गारच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. कामगार आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्याय संदर्भात ते याचिकांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करीत असतात. मूल तालुक्यातील चितेगाव येथील ग्रामपंचायतीचे ते मतदार आहेत. गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अविरोध निवडून देण्यासाठीही प्रयत्न झालेत. मात्र ऐन वेळी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून निवडणूक लढविण्यासाठी काही विरोधी उमेदवारांना रिंगणात उतरविले आणि निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत डॉ. कल्याणकुमार वार्ड नंबर 1 मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि विजयी झाले.
दिल्लीच्या एका नामांकित महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या डॉक्टर कल्याण कुमार यांनी चंद्रपूर मध्ये आल्यानंतर मराठी भाषा अवगत केली. भारतासह जगभरातील इतिहासावर त्यांचे प्रभुत्व आहे.
उच्च विद्याविभूषित ग्रामपंचायत सदस्य झालेले हे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले उमेदवार असण्याची शक्यता आहे.