नागपूर जिल्हातील विविध भागात झंझावाती संपर्क दौरा
नागपूर- पदवीधर मतदारसंघ समाजातील सुशिक्षित लोकांचा मतदारसंघ आहे. समाजातील विविध प्रश्नांची जाण ठेवून त्यादृष्टीने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची जाणीव या मतदारांना आहे. त्यामुळे आपले प्रतिनिधित्व करणारा उमेदवार किती योग्य आहे याची पाहणी त्याच्या कार्यकर्तृत्वावरून करा आणि मगच मत द्या, असे आवाहन हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी केले.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांनी बुधवारी (ता.२५) नागपूर जिल्हा ग्रामीण भागात संपर्क दौरा केला. दौऱ्यादरम्यान संदीप जोशी यांनी बुट्टीबोरी, हिंगणा, वाडी, कोंढाळी, नरखेड, सावरगाव, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापरखेडा आदी ठिकाणी सभा घेतल्या.
हिंगणा आणि वाडी येथे झालेल्या सभेमध्ये हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.राजीव पोतदार, जिल्हा संघटन मंत्री किशोर रेवतकर, महिला आघाडी अध्यक्षा संध्याताई गोतमारे, विकास दाभेकर, डिगडोहच्या सरपंच सौ. काळबांधे, वानाडोंगरी नगरपंचायतच्या अध्यक्षा सौ. शहाकार, हिंगणा नगरपंचायत अध्यक्षा सौ.भोसकर, हिंगणा तालुका महिला आघाडी अध्यक्षा मनिषा गावंडे, विकास दाभेकर, बालू मोरे आदी उपस्थित होते.
कोणतेही कर्तृत्व नसल्याने विरोधकांकडून आता जातीचे राजकारण केले जात आहे. हा मतदारसंघ सुजाण पदवीधरांचा आहे, त्यामुळे त्यांना जातीचा नाही तर आपले प्रश्न समर्पकपणे मांडणारा, त्यासाठी संघर्ष करणाऱ्या खऱ्या प्रतिनिधीची गरज आहे. नागपूर शहराचे विद्यमान महापौर संदीप जोशी हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात कार्य करीत आहेत. सामाजिक जाणिवेतून त्यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प आज सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत आहेत. दुसरीकडे कुठलेही कर्तृत्व नसताना लोकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. अशांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असेही आमदार समीर मेघे म्हणाले.