कोविडची कामे देतांना सुविधा पुरवाव्या
विमा आदेश कामाची सक्ती
पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाभर निवेदने
चंद्रपूर/ प्रतिनिधी
शासन आदेशात नसतानासुद्धा कोविड 19 अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी चे सर्व्हे करण्याचे काम जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहे. आधीच कोविड ची अन्य कामे व शैक्षणिक कार्य असल्यामुळे सदर काम शिक्षकांना देऊ नये अशी मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी व प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
आज जिल्हा शाखेच्या वतीने चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी साहेब यांना व गोंडपीपरी, पोंभुर्ण, चंद्रपूर, राजुरा, जिवती, कोरपना, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, वरोरा, सावली या तालुका स्तरावर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कोविड 19 अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या मोहिमेच्या शासन परिपत्रकात शिक्षकांना हे काम द्यावे असा अजिबात उल्लेख नाही, गावातील 2 स्वयंसेवक व अन्य आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी या टीम मध्ये घ्यावे असे नमूद असतांना सरसकट जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना या कामाचे आदेश देण्यात आले आहे हा मोठा अन्याय आहे. आधीच कोविड सर्व्हे, कंटेन्मेंट झोन मधील कामे, विलगिकरन कक्ष देखभाल अशी कामे शिक्षकांच्या मागे आहेतच त्यातच ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक कार्य सुद्धा करायचे आहे.
करिता हे काम शिक्षकांकडून काढून घ्यावे व पुढील कोविड कामे देतांना अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करूनच द्यावीत अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. यात प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येकाला स्वतंत्र आदेश द्यावा, प्रत्येकी 50 लाखाचा विमा असल्याचा आदेशात उल्लेख करावा, 50 वर्षावरील, अपंग, गंभीर आजारी, स्तनदा माता, गर्भवती स्त्रिया यांना कामातून वगळावे, मास्क सॅनिटायझर व आवश्यक सुरक्षा किट रोज पुरवावी, ऑनलाईन माहिती भरण्याचे काम देऊ नये दिल्यास साधने उपलब्ध करावीत, सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश टीम मध्ये करावा, एकाच शिक्षकाला वर्षभर काम देऊ नये, आळीपाळीने सर्व शिक्षकांना द्यावे, एका शाळेतील एकच शिक्षक घ्यावे म्हणजे शैक्षणिक प्रक्रियेला बाधा येणार नाही, सेवा देतांना कर्मचारी बाधित झाल्यास उपचार खर्च करावा, कामे देताना शाळेच्या कार्यक्षेत्रातच द्यावी, मागील 6 महिन्यापासून कोविड ची विविध कामे करीत असल्यामुळे कोविड योद्धा म्हणून शिक्षकांचा सन्मान व्हावा इत्यादी आवश्यक सूचनांचा विचार व्हावा अन्यथा प्राथमिक शिक्षक या मोहिमेवर बहिष्कार टाकतील याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे विजय भोगेकर, हरिश ससनकर, नारायण कांबळे, लोमेश येलमुले, निखिल तांबोळी, मनोज बेले, सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, पौर्णिमा मेहरकुरे, विद्या खटी, सुलक्षणा क्षीरसागर, सुरेखा वांढरे, प्रशांत कावळे, राजेश धानोरे, प्रतिभा उदापुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.