देलोडा (बु) येथील महिलांची अहिंसक कृती
देलोडा, ता. १ : जप्त करण्यात आल्येल्या दारूसह विक्रेता.
आरमोरी, ता. १ : तालुक्यातील देलोडा (बु) येथे विक्री करण्यासाठी सूर्यडोंगरी मार्गे मोहफुलाची दारू आणत असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यावरून एका जणाची तपासणी केली असता त्याच्याकडे 5 लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. घटनास्थळावर पोलिस पाटील यांना बोलावून पंचनामा करण्यात आला.
सूर्यडोंगरी येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्रेते आहेत. यामुळे दारूबंदी असलेल्या गावांतील मद्यपी या गावाकडे धाव घेत असतात. देलोडा (बु) येथे गाव संघटनेच्या महिलांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे वर्षभर दारूबंदी कायम होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात शेतीचे कामे सुरु झाल्यामुळे गाव संघटनेच्या महिला व्यस्त झाल्या. या संधीचे सोने करीत अनेक दारूविक्रेत्यानी छुप्प्या मार्गाने दारूविक्री सुरु केली. यामुळे गावातील मद्यपींना पुन्हा सहजतेने दारू उपलब्ध होऊ लागली. परिणामी कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडत असून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
गाव संघटनेच्या महिलांनी गावातील दारूविक्रीवर बंदी घालण्यासाठी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार देलोडा (बु) - सूर्यडोंगरी मार्गावर गस्त घातली असता गावात विक्री करण्यासाठी दारू आणत असल्याचे निदर्शनास आले. महिलांनी त्या इसमास अडवून त्याच्याकडून 5 लीटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. महिलांनी जप्त दारू व दारुविक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठरविले. मात्र, पुर परिस्थिति असल्यामुळे पोलिस स्टेशन गाठता आले नाही. त्यामुळे घटनास्थळावर गावातील पोलीस पाटील, तंमुस अध्यक्ष यांना बोलावून पंचनामा करण्यात आला. गाव संघटनेच्या ताब्यात असलेला जप्त मुद्देमाल पुराचे पाणी उतरताच पोलिसांच्या स्वाधीन केल्या जाणार आहे. महिलांच्या या कृतीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.