लोकबिरादरी प्रकल्पाचा उपक्रम
भामरागड, 2 : आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्न, त्यावर मार्ग शोधणारे 12 दिवसीय वेबिनार लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा नुकतेच पार पडले. सदर वेबिनारमधून तज्ञ मार्गदर्शकांनी लोकसंवाद साधला. यामध्ये देशातून व महाराष्ट्रातील अनेक शिक्षक,पालक सहभागी झाले होते.
जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या प्रेरणेतून व लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या कल्पनेतून तसेच समिक्षा गोडसे यांचे पुढाकाराने 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत बारा दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील शिक्षणावर विविध विषय घेऊन लोकसंवाद साधण्यात आला. अनेक शिक्षक व पालकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे तज्ञ मार्गदर्शकाकडून निरसन करण्यात आले.
वेबिनारच्या यशस्वीतेसाठी समिक्षा गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली अमित कोहली, गौरव नायगावकर, यतीश जाधव, मनिषा पवार, तुषार कापगते, प्रा. गिरीष कुलकर्णी, कांचन गाडगीळ, जमिर शेख, सुरेश गुट्टेवार, प्रा. खुशाल पवार इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
....................
वेबिनारमध्ये या तज्ञांनी केले समाधान
तज्ञ मार्गदर्शकांत ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील महेंद्र सेठिया यांनी 'शिक्षकांसाठी स्वयंविकासाच्या संधी व दिशा' या विषयावर मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील युनिव्हर्सिटी ऑफ लाईफचे संचालक सचिन देसाई यांनी बिनभिंतीची शाळा कशी असायला हवी हे स्पष्ट केले. पुणे येथील क्वेस्ट संस्थेचे संस्थापक व संचालक निलेश निमकर यांनी 'लॉकडाउन पश्चात शिक्षणापुढील आव्हाने', साधना साप्ताहिकाचे पुणे येथील संपादक विनोद शिरसाठ यांनी 'आपण विचार कसा करावा?, दिल्ली येथील दि टिचर अॅपच्या सहसंस्थापिका सरिता शर्मा यांनी 'शिक्षण क्षमता विकास', होमीभाभा रिसर्च सेंटर मुंबईचे नागार्जुन, रवि सिन्हा व दुर्गाप्रसाद यांनी 'संशोधनात्मक प्रकल्पाची मांडणी कशाप्रकारे करायची', कृष्णमुर्ती फाऊॅंडेशन बेंगलोर (कर्नाटक) येथील जाई देवळाळकर यांनी 'शाळा आणि शिक्षण यातील सौंदर्यात्मकता', सुकमा(छत्तीसगड) येथील शिक्षक निरज नायडू यांनी सुकमा जिल्ह्यातील शिक्षणाचे अनुभव विषद केले. 'वंचितांचे शिक्षण'या विषयावर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील प्रसिद्ध वक्ते व लेखक हेरंब कुलकर्णी यांनी संवाद साधला. कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. नंदकुमार मोरे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी' आदिवासींचे शिक्षण, पर्यावरण आणि साहित्य' या विषयावर मार्गदर्शन केले. 'आश्रम शाळा संहिता,रचना, बलस्थाने व त्रुटी'यावर जयश्री तिखे हिने प्रकाश टाकला. वेबिनारच्या शेवटच्या बाराव्या दिवशी साधना विद्यालय नेलगुंडा व जिंजगाव येथील शिक्षक सुनिल पुंगाटी व अजय वेलादी यांनी 'प्रवास साधना विद्यालय ह्या स्वप्नाचा!' यावर मुक्तपणे संवाद साधला. वेबिनारमध्ये दररोज अनेकांनी विविध प्रश्न विचारले; त्यावर मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे दिली.