विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडून दखल
कोरोना सर्वेत मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांचे प्रकरण
नागपूर - कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. यातूनच राज्यभरात शिक्षकांचे बळी गेले आहे. त्या कुटुंबियांना ५० लाखाची कोविड योध्दा अंतर्गत मदत द्यावी तसेच कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना विभागीय आयुक्तांमार्फत बुधवारी (ता १६) दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. आज (ता १८) मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी निवेदनाची दखल घेतली असून अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व आरोग्य विभागाकडे पुढिल कार्यवाहीसाठी पाठविले आहे. या संदर्भातील मेल संघटनेला प्राप्त झाला.
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, राज्यातील शिक्षकांना कोविड १९ च्या कामात सहभागी करुन घेतले. मात्र या शिक्षकांना कुठलेही संरक्षण कवच दिले नाही. आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग प्रतिबंधक कायद्याचा धाक दाखवून स्थानिक प्रशासन त्यांच्याकडून कोविड १९ चे काम करुन घेत आहे. यातूनच संसर्ग होऊन नागपूर जिल्ह्य़ात श्री रामदास काकडे यांचे बुधवारी (ता १६) पहाटे दवाखान्यात निधन झाले.
कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात असलेले अनेक शिक्षक हे अंशदाय पेन्शन योजने अंतर्गत आहे. त्यामुळे निधन झाल्यास संपूर्ण परिवार उघड्यावर येण्याची भीती शिक्षकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
कोविड १९ कामात असणाऱ्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे शालेय शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट व शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी ३१ आॅगस्टच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी नागपूर यांना कळविले होते. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) मुख्य सचिव, प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन) व जिल्हाधिकारी नागपूर यांना ७ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देऊन कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे व शासन आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
कोरोना योध्दा म्हणूनही शिक्षकांचा समावेश नाही तसेच ५० लाखाच्या विम्या संदर्भातही शासनाकडून स्पष्टता करण्यात आली नाही. अशा बिकट परिस्थितीत नागपूर विभागात व संपूर्ण महाराष्ट्रात कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणात शिक्षक व्यस्त आहे.
कोरोना सर्वेक्षणाचा श्री रामदास काकडे यांच्या रुपात नागपूर जिल्ह्य़ातील पहिला बळी ठरला आहे. यामुळे तातडीने बुधवारी (ता १६) विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग यांना निवेदन देऊन शिक्षक कोविड योध्दा अंतर्गत ५० लाखाची मदत करावी, कार्यरत सर्वेक्षक शिक्षकांचा ५० लाखाचा विमा जाहीर करावा, कोविड योध्दांना तातडीने वैद्यकीय औषधोपचार मिळावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी महसूल उपायुक्त श्री तेलंग यांनी मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल व इतर विषयांवर तातडीने सर्व जिल्हाधिकारी सोबत चर्चा करुन सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. या संदर्भात मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी पाठविलेल्या निवेदनावर तत्काळ कारवाई करत सदर मागणी पूर्ण करण्यासाठी हे प्रकरण अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व अप्पर मुख्य सचिव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहे. यामुळे आता कोविड १९ अंतर्गत सर्वेक्षणात मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांना 50 लाखाचा लाभ व कार्यरत शिक्षकांना 50 लाखाचा कोरोना योध्दा विमा संरक्षण कवच लागू करण्यासंदर्भात हालचाल सुरू झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने कोविड 19 सर्वेक्षणाच्या कामातील शिक्षकांचा ५० लाखाचा विमा संरक्षण न दिल्यास शासन आदेशान्वये शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे अशीही मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. लवकरच या विमा संदर्भातील आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंत्रालयीन सुत्राकडून कळले आहे. या संपूर्ण लढ्यात
शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री शेषराव खार्डे, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, हिंगणा तालुका संघटक श्री कुंदन भारसागडे, अपंग विभाग जिल्हा संघटक श्री दिनेश गेटमे, श्री संदिप गोलर, श्री प्रवीण साबळे, श्री अतुल रंगारी सहभागी होते.
-—---------------------------------
शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
असून या संदर्भात आवश्यक तिथपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल. जिल्हाधिकारी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचा मान ठेवत शिक्षकांना कोविड 19 सर्वेक्षणाच्या कामातून तातडीने कार्यमुक्त करावे.
-मिलिंद वानखेडे
शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर