गुरे मालकांवर दंडात्मक कार्यवाही करा
स्थानीक नागरीकांची मागणी
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात)
येथील राष्ट्रीय महामार्ग व शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोकाट जनावरांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढून जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्यामुळे अपघाताचेही प्रमाणात वाढ झाली आहे . दत्तवाडी येथील वैष्णव मातानगर येथील निवासी मृतक दर्शन माणिकनाथ मेश्राम वय २५ वर्ष हा शनिवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० च्या सुमारास दुचाकीने कामावर अमरावती महामार्गाने जात असताना भारत अपार्टमेंट-पेट्रोल पंपसमोरील दुभाजकावरील झुडपातून गाय अचानक रस्त्यावर उतरल्याने दर्शनचे गाडीवर नियंत्रन सुटून गाईला धडक बसली त्यात तो खाली पडून महामार्गाच्या दुभाजकाला धडकला. यात तो गंभीर जखमी झाला. जोरदार आवाज झाल्याने जवळपासचे नागरिक व महामार्गाने जाणारे प्रवास करणारे वाहनचालकांनी मदतीसाठी धाऊन आले व घटनेची सूचना वाडी पोलिसांना दिली पोलिसांनी वाडी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले.डॉक्टरानी शर्तीचे प्रयत्न केले परंतु दर्शनाचा मृत्यू झाला.संबंधित युवकाचा मृत्यू हा मोकाट जनावरांमुळे झाला आहे. स्थानिक प्रशासना विरोधात शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल यांनी रोष व्यक्त करून वाडी नगरपरिषदचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना निवेदन देऊन गुरेमालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .
वाडी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व शहरातील विविध मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असून गाई-म्हशी,लावारीस कुत्री सरासपणे दिवसा,रात्री-बेरात्री रस्त्याच्या मधोमध,आजूबाजूला व रस्ता दुभाजकावर ठाण मांडून बसत असल्याने स्थानिक नागरिक यात प्रामुख्याने महिला,वयोवृद्ध,तसेच रात्री-बेरात्री कामावरून घरी मार्गक्रमण करणारे वाहन चालक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाडी पोलीस स्टेशनसमोर सुध्दा मोकाट जनावरे ठाण मांडून बसल्याचे चित्र पहावयास मिळते .
स्थानिक प्रशासनाने अशा मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात बंद करून संबंधित गुरे मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी हर्षल काकडे ,संतोष केचे ,संतोष नरवाडे ,श्याम मंडपे , दुर्योधन ढाेणे ,प्रकाश कोकाटे ,अश्विन बैस,शैलेश थोराने , वसंतराव इखनकर ,राजेश थोराने ,दिनेश उके,राजेश जिरापूरे ,मनोज रागीट ,संजय अनासाने ,राहूल सोनटक्के ,रुपेश झाडे ,मधु माणके पाटील ,विजय मिश्रा ,अखिल पोहणकर ,कपील भलमे ,क्रांतीसिंग ,योगेश चनापे ,अतुल शेंडे, राजु मिश्रा आदींनी केली आहे. प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने थकीत बिल दिले नसल्याची तसेच वाडी पोलिसांनी या समस्येची वारंवार स्थानिक नगर परिषद प्रशासनाला माहिती देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याची माहिती पुढे येत आहे.