महाज्योती बचाव कृती समिती मागणी
व्यवस्थापकीय संचालक व समाजकल्याण उपायुक्तांशी चर्चा
नागपूर - OBC, VJNT व SBC प्रवर्गासाठी नव्याने स्थापन झालेल्या महाज्योती संस्थेचे कार्यालय तातडीने कार्यान्वित करुन गरजवंताना तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी महाज्योती बचाव कृती समिती तर्फे करण्यात आली.
महाज्योती बचाव कृती समिती नागपूर विभाग तर्फे सोमवारी (ता 24) महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीपकुमार डांगे व विभागीय समाजकल्याण उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड यांची भेट घेण्यात आली. या भेटीत महाज्योतीची कार्यप्रणाली, संभाव्य योजना, कार्यपद्धती, महाज्योतीसाठी बार्टीचा पॅटर्न स्विकारण्यात यावा, भटक्या विमुक्त व बारा बलुतेदार (ओबीसी) प्रवर्गातील दुर्लक्षित राहिलेल्या जातींना व संपूर्ण भटक्या विमुक्तांचे जिवनमान उंचाविण्यासाठी भरकस प्रयत्न करण्यात यावे, अशी आग्रही मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली.
या भेटीत श्री दिनानाथ वाघमारे यांनी भटक्या विमुक्तांची विविध अंगांनी होणारी होरपळ व उच्च न्यायालयात संघर्ष वाहिनी तर्फे दाखल असलेल्या प्रकरणाची माहिती तर शिक्षक नेते व ओबीसी संघटक श्री मिलिंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तातडीने जेईई-निट सारखे प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी केली. श्री खिमेश बढिये यांनी महाज्योतीचा प्रारुप आराखडा तातडीने तयार करुन त्याची अंमलबजावणीची मागणी केली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक MD श्री प्रदीपकुमार डांगे यांचे महाज्योती बचाव कृती समिती नागपूरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीत महाज्योती बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य नागपूर विभागीय संघटक श्री दिनानाथ वाघमारे, श्री मिलिंद वानखेडे, श्री किशोर सायगन, श्री खिमेश बढिये, श्री शेषराव खार्डे, श्री समीर काळे उपस्थित होते.