- घोडणकप्पी गावात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भरणार आहे पहीली ग्रामसभा
- विकास कुंभारे यांचे आदिम समुदायाच्या प्रश्नासाठी लाक्षणीक उपोषण
राजुरा : माणिकगड पहाडावर निजामकालीन घोडणकप्पी या आदिवासी वस्तीला जाण्यासाठी अजूनही रस्त्याची सुविधा नाही तर याच गुड्याचा दुसरा भाग असलेल्या कोलामगुड्यावर पाण्याची सुविधा नसल्याने येथील आदिम समुदाय जीवघेणा संघर्ष करीत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या वस्तीवरील ग्रामस्थ आतापर्यंत ग्रामसभेपासून वंचित राहीलेले आहे.
स्वातंत्र्यदिनी या वस्तीवर स्वतंत्रता जागर अभियानांतर्गत ध्वजारोहण, ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून, आदिम समुदायाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे लाक्षणीक उपोषण करणार आहेत.
जिवती तालुक्यात भारी ग्रामपंचायतीतील घोडणकप्पी हे गाव शंभर टक्के आदिवासी असून, येथे कोलाम व गोंड समुदायाचे वास्तव्य आहे. अगदी निजाम काळापासूनच ही वस्ती अस्तीत्वात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविली जाईल असे आश्वासन प्रत्येक सरकारे व लोकप्रतिनिधींनी दिले. मात्र, या वस्तीतील आदिवासी समुदायास विकासकामापासून जाणिवपुर्वक दूर ठेवल्याचे लक्षात येते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या वस्तीपर्यंत जाण्यासाठी अद्यापपर्यंत रस्ताच नसल्याने येथील आदिवासी समुदायास जिवघेणा संघर्ष करावा लागत आहे. सत्तरच्या दशकात या वस्तीला आग लागल्याने ही वस्ती जळून खाक झाली. वस्तीवरील कुटूंबे वाट मिळेल तिकडे पळून गेलीत. ज्याला जिथे आश्रय मिळेल तिथे ते राहू लागले. मात्र, काही कुटूंबे पुन्हा आपल्या गावात परतली व झोपड्या उभारून राहू लागलीत. या घटनेला बराच काळ उलटला असला तरी वस्तीच्या सोयी-सुविधेची दखल घेणारी यंत्रणा येथे कार्यान्वित झालेली नाही. गावाच्या विकासाची चर्चा करणा-या ग्रामसभेपासूनच येथील ग्रामस्थांना वंचीत ठेवण्यात आले. या वस्तीतील लक्ष्मीबाई वल्के यांनी सांगीतले की, आमाले ग्रामपंचायत माहीत नाही अन् ग्रामपंचायतीची मिटींगबी माहीत नाही. सरपंच कोण आहे, ग्रामसेवक कसा दिसते हेबी आमाले माहीत नाही. कधी कुणी मिटींगचा निरोप घेऊन गावात आला नाही.
आमच्या वस्तीसाठी काम करणारा कुणीबी माणूस इकडे भटकला नाही. आतापर्यंत आमच्या विकासासाठी सरकारने पैसे पाठविलेच नाही का जी ? असा प्रश्न गावक-यांनी उपस्थित केला आहे.
जिवती तालुक्यातील या उपेक्षीत वस्तीवर प्रथमच तिरंगा फडकाविला जाणार असून, वस्ती सभोवतालच्या डोंगरकपारीतून सुपरीचीत गायिका अल्का सदावर्ते हे मंगलमय स्वातंत्र्यगीते गाणार आहते. या सोहळ्याला कोलाम विकास फाऊंडेशनला पाथ फाऊंडेशन व स्वरप्रिती कला अकादमीचे सहयोग लाभले आहे. या सोहळ्याच्या समारोप समारंभाला माजी आमदार अँड. वामनराव चटप, पत्रकार देवनाथ गंडाटे, पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक चटप, स्वरप्रितीचे अध्यक्ष दिलीपराव सदावर्ते व अन्य गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.