भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कामगार वर्गासाठी सुरू केलेली योजना तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून धोरणातला विरोधाभास स्पष्टपण दिसून येतो असे टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’ अंतर्गत नोंदणी केल्यावर या कामगारांना हत्यारे / अवजारे खरेदीकरीता रू. 5000/- चे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यास आज मंजूरी ही देण्यात आली.
एकीकडे सरकार अधिकाधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जनतेला देते मात्र दुसरीकडे कामगारांना आवश्यक असलेल्या सुविधा पूरविणारे योजना रद्दबातल करण्याचे धोरण अवलंबत आहे, तेव्हा हे सरकार दुतोंडी आहे अशी टीका श्री. उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.