जुन्नर / आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ मारुती पवार (वय ६७) यांचे आज (ता. ८) सकाळी निधन झाले.
नगरसेवक दिनेश दुबे यांच्या निधनानंतर पवार यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादी पक्षाचा दुसरा नेता गमविला आहे.
कोरोनाबाधित झाल्यावर दशरथ पवार यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.
मात्र, त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारही होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार हे जुन्नर तालुका पंचायत समितीचे सन 1992 ते 1997 या सलग पाच वर्षांत सभापती होते.
त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता.
चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम त्यांनी तालुक्यात राबविला होता. हाच कार्यक्रम नंतर जिल्ह्यात राबविला गेला.
पंचायत समितीचे सभापती पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत गावभेट कार्यक्रमातून गावचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते. तालुक्यात त्यांच्या काळात अनेक बंधारे झाले. त्याचा आज लोकांना लाभ होत आहे.
पारुंडे हे दशरथ पवार यांचे मूळ गाव होते. येथे भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते. गावात एकोपा रहावा, यासाठी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे. गावच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी पारुंडे गावच्या विद्यमान सरपंच आहेत.
जुन्नर येथील शिवाजी मराठा शिक्षण संस्था, क्रांती गणेश मंडळ यांच्याशी त्यांचा जवळून संबंध होता. सर्वसामान्य कार्यकर्ता ते सभापती व प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित होते, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पारुंडे व परिसरात शोककळा पसरली.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,उपमुख्यमंत्री आजितदादा पवार , माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे ते विश्वासू सहकारी होते. जुन्नर तालुक्यातील एक कबड्डी खेळाडू हरपला.
जुन्नर तालुक्यातील राजकारणातील ,व सामाजिक क्षेत्रातील सर्वसामान्य माणसांना बरोबर घेवून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी ,३मुली,२मुले असा परिवार आहे.
शरद पवार ,अजित पवार दशरथ पवारांना म्हणत असत आमची भावकी कोठे आहे. आज भावकी जुन्नर तालुक्याच्या राजकारणात दिसणार नाही, असे माणसांला सर्वसामान्य वाटत आहे.