Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै १८, २०२०

हलशी- बेळगाव सुंदर पर्यटनस्थळ

हलशी-बेळगाव ‘पर्यटनस्थळ’ दर्जा...तरीही दुर्लक्षित


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले हलशी गाव म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील एक अतिप्राचीन गाव.
सभोवतालची पर्वतराई आणि गर्द हिरवी वनराई यांनी नटलेला हा परिसर! एकवीस वेळा क्षत्रिय कुलाचा नाश करणार्या जमदग्नीसुत परशुरामाच्या क्षेत्रातील एक पवित्र स्थळ म्हणूनही हलशीला ओळखले जाते. त्याहीपेक्षा हलशीला मोठे भाग्य लाभले आहे, ते म्हणजे कदंब अधिपती पलसी देशाची राजधानी म्हणून. ‘पलासिका’ बारा हजार प्रांतांची हलशी राजधानी होती. असे असले तरी आजच्या लोकशाहीत प्रशासनाकडून हलशी अद्यापही दुर्लक्षितच आहे
देशातील पुरातन स्थळांना शासनाने पर्यटन स्थळांचा दर्जा देऊन विकसित केले आहे. हलशी गावदेखील पुरातन असून, शिवाय शेकडो कदंबकालिन मंदिरांची येथे मांदियाळी असल्याने या गावाला केंद्र सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. हलशी गाव आज जगाच्या नकाशावर जरी दिसत असले, तरी येथे अनेक सुविधांची वानवा आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटक शासनाने कदंबोत्सवाला चालना देऊन गावचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राजकीय पुढार्यांना हा कदंबोत्सव केवळ मिरवून घेण्याचे व्यासपीठच वाटते. वर्षातून एकदा गावावर आश्वासनांची खैरात करून तोंडाला पाने पुसली जातात. यामुळे हलशी पर्यटनस्थळाचा विकास केवळ आश्वासनांवरच हवेत अधांतरी तरंगू लागला आहे.
चार मंदिरे ताब्यात
गावातील शेकडो मंदिरांपैकी प्रमुख चार मंदिरे केंद्र सरकारने ताब्यात घेतली आहेत. यामध्ये श्रीनृसिंहवराह, श्री रामेश्वर, कलमेश्वर व सुवर्णेश्वर मंदिरांचा समावेश आहे. तर उर्वरित शेकडो मंदिरे राज्य सरकारने ताब्यात घेतली आहेत. केंद्र सरकारने चारीही मंदिरांचे पुरातन विभागामार्फत नूतनीकरण केले आहे. राज्य सरकार मात्र, अद्याप पाऊल उचलण्यास दिरंगाई करीत आहे. शिवाय पर्यटन खाते हलशीच्या बाबतीत म्हणावे तितके लक्ष पुरवित नसल्याने कदंबांची पलासिका अद्यापही दुर्लक्षित राहिली आहे. याकरिता राजकारणी व प्रशासनाने प्रथम हलशीचे महत्व जाणून घेेणे गरजेचे आहे.
कदंब राजवट देशातील सर्वात मोठी राजवट म्हणून ओळखली जाते. सुरूवातीला कदंबांच्या सत्तेखालील प्रांताचे सामान्यत: बारा भौगोलिक विभाग पाडले गेेलेे.
धारवाड नरेंद्रपासून हलशीबेळगावपर्यंतच्या भागाला ‘सुद्धीकुंदूर’ म्हणून ओळखले जाई. या विभागातील हलशी हेे एक महत्वाचे ठिकाण होते. या प्रांताची ही राजधानी म्हणून नावारूपाला आली. आज किमान पाच जिल्ह्यांनी व्यापलेला प्रांत या राजधानीच्या अधिपत्याखाली येत होता. उत्तरेला कराडसांगलीचा भाग, पूर्वेला बदामीच्या अलिकडील विजापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग, आग्नेयेला धारवाडहुबळी, कलघटगी, कुंदगल, तालुके, दक्षिणेला हनगलहल्याळ, सुपा (जोयडा) तालुके, पश्चिमेला गोव्याची संपूर्ण हद्द तर वायव्येला सिंधुुदुर्ग जिल्हा या राजधानी अधिपत्याखाली येत असे. त्यानंतर राजा रविवर्मा कदंबाच्या काळात (इ. स. 485519) उत्तरेला नर्मदा नदीपर्यंतचा भूभाग या राजधानीच्या अखत्यारित होता.
त्यानंतर गोवा कदंबाच्या काळात मिरज 3000, कुंडी 3000, कर्हाड 4000 या प्रांतांचा कारभार स्वतंत्र झाल्याने हलशी प्रांतांची संख्या 1100 पर्यंत खाली आली. याकाळी 1500 खेड्यांचा प्रांत जिल्हा म्हणून ओळखला जाई. पलासिका, कुंदूर, मावळ (महाराष्ट्रातील पश्चिमेचा भाग) मुर्हापासून 70 कि. मी. पर्यंत पसरलेला रायगडपर्यंतचा भाग, मिरज व कुंडी इत्यादी भाग हलशीच्या अधिपत्याखाली आला होता. या पलासिका जिल्ह्यात कापोली, असोगा, खानापूर, कलगिरी ही काही महत्वाची गावे होती.
पनासिका पलासिका
बेळगावच्या दक्षिणेला अवघ्या 42 कि. मी. वर असलेल्या या गावाला प्राचीनकाळी ‘पनासिका’ या नावाने ओळखले जाई. पनास म्हणजे फणस व ईका म्हणजे नामप्रत्यय आहे. फणस वृक्षांनी व्यापलेला हा भाग असल्याने पनासिका नाव पडले असावे, असे सांगण्यात येते. त्यानंतर दुसर्या नावाच्या बाबतीतही पुन्हा एका वृक्षाचाच उल्लेख येतो. तो वृक्ष म्हणजे पळस (पनसुडा). वर्षभरातील हिरवेगार रूप टाकून शिशिरात धरणीला केसरी, रक्तवर्णी रंगछटांचा साज चढवून महिनादीड महिना फुलांचा राजा म्हणून मिरविणारा पळस! राजा मृगेश वर्मा याने पाचव्या शतकात हलशीला ‘पलासिका’ म्हणून नाव दिले. आजही हलशीच्या सभोवताली पळसाच्या वृक्षांची विपूल गर्दी पहावयास मिळते. जवळजवळ सहा शतके पलासिका नावाने संबोधल्यानंतर अकराव्या शतकात पलासिका शब्दात बदल होऊन कॅनरसे भाषेत ‘पलासिके’ म्हणून हलशीचा परिचय झाला. गुवळदेव कदंब तिसरा याने हलशीला पलासिके म्हणून नाव दिले.
पुढे तिसरा जयकेशी (इ. स. 11201125) याने धारवाड शिलालेखात ‘प’ चे ‘ह’ व ‘क’ चे ‘ग’ करून ‘हलसीगे’ असे संबोधले. त्यानंतर परमादीदेव व विजयादित्य यांनी हलशी शिलालेखात पळसी व पनसी नावाने गावाची नवी ओळख करून दिली. शिवाय तिसर्य जयकेशीने मानगुंदी शिलालेखात ‘पलसुगे’ म्हणून लिहिले आहे. त्यानंतर पुन्हा हलसीगे होऊन कालांतराने हलशी असे नामकरण झाले आहे. कदंब राजांनी या राजधानीतून सुमारे नऊशे वर्षे आपला राज्यकारभार हाकला आहे. यामुळे शासनाने या गावचा पूर्वेतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
नृसिंहवराह मंदिर हे अतिजागृत मंदिर म्हणून मानले जाते. हे मंदिर म्हणजे कदंब वास्तूशास्त्राचा विकसित नमुनाच आहे. जसे मंदिर विस्तृत तसा परिसरही विस्तृत आहे. कदंबांची किर्ती पताका फडकावित हे मंदिर गेली आठ शतकं उभे आहे. मंदिराच्या भक्कम दगडी भिंती पांढर्या ग्रॅनाईटच्या आहेत. अकरा पायर्यातून वर गेलेले पिरॅमिडकृती गोपूर व त्यावर कळस याची प्रशस्त बांधणी पाहून आजच्या विज्ञानयुगातील संशोधकही तोंडात बोट घालतात. यावरूनच कदंबाची शिल्पकला आणि कल्पकता किती उच्चदर्जाची होती, याची कल्पना येते.
देवालयात प्रवेश करताच एक शिलालेख दृष्टीस पडतो. तोच इतिहासात हलशी शिलालेख म्हणून ओळखला जातो. त्यानुसार बाराव्या शतकातील परमादीदेव कदंब याच्या विनंतीनुसार ‘मरयोगी’ नावाच्या सत्पुरूषाने हे देवालय बांधून श्री नृसिंह देवाची प्रतिष्ठापना केली आहे. मंदिराला दक्षिणोत्तर असे दोन दरवाजे आहेत. पूर्वदिशेला एक दरवाजा होता. तो बुजवून तिसर्या जयकेशी कदंब याने नृसिंह व आदीनारायणासमोर वराहदेवाची प्रतिष्ठापना केली आहे. यामुळे पूर्वप्रवेशद्वार बंद करावे लागले. मंदिरात चालुक्य बांधकाम पद्धतीचा प्रभाव दिसून येतो. सभागृहात अखंड गुळगुळीत पाषाण आणि केंद्रस्थानी कासव आहे. वर्तुळाकार कोरलेले अखंड दगडी खांब छताला तोलून धरण्यासाठी दिमाखात उभे आहेत.
♍रामेश्वर मंदिर♍
नृसिंहवराह मंदिराबरोबर पर्यटकांचे आवडते मंदिर म्हणून रामेश्वर मंदिराला ओळखले जाते. हलशीच्या नैऋत्येला दोन कि. मी. अंतरावरील उंच टेकडीवर सृष्टीचा कल्याणकारी ईश्वर रामेश्वराच्या रूपाने स्थानापन्न झाला आहे. या परिसराला रामतीर्थ म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे जाणारी पाऊलवाट हलशी गावाबाहेरील माळरान सोडून डोंगरमाथ्याकडे जसजशी जाऊ लागते, तसा वार्याच्या मंद झुळुकासोबत रानफुलांचा राकट वास संवेदित करून जातो. टेकडीवर चढत जावे तसे शुद्ध मोकळी हवा कानाशी गुंजण घालते. अवघ्या पंधरा मिनिटात आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. मंदिराची पूर्णाकृती आपल्या नजरेत येते.♍ रामेश्वर मंदिर म्हणजे एक छोटा भागारा, एक देवडी आणि साधारणत: पंधरा बाय पंधरा फूट आकाराच्या मापाचे मुखमंडप! गाभार्यावर पिरॅमिडकृती गोपूर आहे. त्यावर गोल गुळगुळीत कळस आहे. गोपुराचा काही भाग कमानीसारखा बाहेर आलेला असून, त्यावर सिंहाच्या मुखाकृतीचे शिल्प आहे. उजवा पाय वर उचललेला सिंह हे कदंबांचे राजचिन्ह आहे.
मंदिर गाभार्यात ईश्वरलिंग व देवडीत नंदी विराजमान आहे. मुखमंडप पूर्ण असूनदेखील त्याखाली बसण्याचे भाग्य या भोळ्या वृषभाला मिळाले नाही. मुखमंडपात देवडी भिंतीत दोन कोनाडे आहेत. डाव्या कोनाड्यात नागयुग्म तर उजव्या कोनाड्यात महिषासूरमर्दिनीची सुबक रेखीव मूर्ती आहे. महिषासुराला मारणार्या या मर्दिनीचे वाहन सिंह बाजूला आहे. उत्तर कोनाड्यात ब्रम्हशिल्प आहे.♍
या मंदिराला लागूनच उत्तराभिमुख विष्णूमंदिर आहे. हेच सूर्यनारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. पर्वतमाथ्यावरील पावनकुंडाच्या काठी हरिहराची उभारणी करून शिव आणि विष्णू उपासकांचा सुयोग्य संगम येथे घडविण्यात आला आहे. सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला युद्ध खेळणार्या महिला सैनिकांचे शिल्प आहे. सामान्य क्षत्रिय स्त्रियांना घरचे कर्ते पुरूष बाहेर असताना स्वत:चे व गावचे संरक्षण करावे लागत असे. खेड्यातील स्त्री त्याकाळी युद्धात तरबेज होती. याचा हा सबळ पुरावा येथे पहावयास मिळतो. या मंदिरावर छोटे गोपूर असून, समोरील भागात अडीच फुटी नारायणाची सुंदर मूर्ती आहे.
या मंदिराच्या दक्षिण बाजूने 15 फूट अंतरावर छोटे ईश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे जणू उघडा गाभाराच. गाभार्यात ईश्वर वर्षभर ऊनपाऊसथंडीशी सामना करतात. तीर्थाच्या उत्तर काठावरदेखील साळुंकीवर दोन फूट शंकराची मूर्ती अशीच उन्हापावसात असते.
या मंदिराच्या सभोवताली विस्तृत पाषाण आहे. पाषाणावर काही ठिकाण रथचक्रे गेल्याचे दिसते. मंदिराच्या दक्षिण टेकडीवर दोन फूट रूंद आणि तीन फूट खोल असे खड्डे दिसतात. या खड्ड्यात उन्हाळ्यातदेखील पाणी असते. त्यात निळीपांढरी कमळफुले उगवतात. हे या टेकडीचे आगळे वैशिष्ट्य मानावे लागेल. रथचक्रांचा मार्ग छोटे खड्डे यावरून या टेकडीवर रामाने रावणाशी सीतामाईसाठी युद्ध केले, अशी एक आख्यायिका आहे. याच टेकडीवर वीस बाय पंधरा फूट आकाराचा आणि तीनचार फूट उंचीवर असलेला एक विशाल पाषाण आहे. तो आजही अधांतरी आहे. सभामंडपाप्रमाणे याची रचना आहे. म्हणून याला सभामंडप म्हणून ओळखतात.
मंदिराच्या टेकडीवरून सभोवताली नजर टाकल्यास 30 ते 40 कि. मी. अंतरावरील भूप्रदेश दृष्टीपथात येतो.♍ सभोवताली ठिकठिकाणी दिसणारी हिरवळ तीव्र उन्हाचे चटके कमी करतात. हा संपूर्ण परिसर नयन मनोहर असल्याने देशविदेशातील पर्यटक येथे गर्दी करतात.या दोन मंदिरांप्रमाणेच हलशी व परिसरात अनेक मंदिरे पहायला मिळतात. काही मूर्ती व मंदिरे जमिनीत गाडली गेली असल्याचे सबळ पुरावे इतिहासकारांना मिळाले आहेत. गेल्या दहा वर्षात चार मंदिरांची डागडुजी करताना अनेक दुर्मिळ मूर्ती हलशी येथे सापडल्या आहेत. नृसिंह मंदिर परिसरात नागमूर्ती, हनुमान मूर्ती, आदीनारायण मूर्ती अशा अनेक मूर्ती आढळल्या आहेत. तर मागील वर्षी सुवर्णेश्वर मंदिराचे काम सुरू असताना मंदिराच्या डाव्या पायरीत पाच फूट उंचीची रेखीव सुबक शिवपार्वतीची मूर्ती सापडली आहे.♍ हलशी येथे सापडलेली ही दुर्मिळ मूर्ती म्हणून तिचा नावलौकीक झाल्याने आजही ही मूर्ती पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येथे येत आहेत. लक्ष्मीनृसिंह राईस मिलच्या पाठीमागील बाजूस कदंब राजाचा राजवाडा होता. शिवाय राजवाड्यानजिकच स्मशानभूमी असल्याने येथे अनेक पुरावे मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात धारवाड विद्यापीठाने गावात दोन ठिकाणी उत्खनन केले आहे. त्याठिकाणी टेहळणी बुरूज, राजवाड्याचे अवशेष सापडले आहेत. गावात उत्खनन केल्यास अनेक मंदिरे व दुर्मिळ मूर्ती मिळू शकतात, असे सांगण्यात येते.♍

हलशी-बेळगाव ‘पर्यटनस्थळ’ दर्जा...तरीही दुर्लक्षित


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.