नागपूर/प्रतींनिधी:
नाग नदीच्या पाण्यासंदर्भात मनपा आयुक्तांच्या नावाने चुकीचा संदेश लिहून त्याद्वारे अफवा पसरविणा-या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत नागपूर महानगरपालिकेतर्फे सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुरुवारी २३ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक चुकीचा संदेश प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांचे नांव टाकून 'नागपूर मिम्स कॉर्पोरेशन' (Nagpur Memes Corporation) या नावाने 'नागपूर शहरातील नागनदीचे पाणी कमी प्रदूषण व सांडपाण्याच्या कमतरतेमुळे पिण्यायोग्य, उद्यापासून शहराला नागनदीच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. - म.न.पा.आयुक्त तुकाराम मुंडे' असा मजकूर मनपाचा लोगो वापरुन फेसबुकवर तो प्रसारित केला आहे.
नागपूर महानगरपालिकेव्दारे नागनदी चे पाणी शहराला पुरवठयाबाबत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही व नागपूर महानगरपालिकेद्वारे असा कोणताही संदेश प्रसारित करण्यात आला नाही. अशा चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन संभ्रमाची स्थिती आहे. शिवाय यामुळे महानगरपालिकेची बदनामी होत आहे.
त्यामुळे अशाप्रकारे चुकीच्या संदेशाव्दारे अफवा प्रसारीत करणाऱ्यांविरूध्द आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारी मार्फत करण्यात आली असुन सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.एस.बनसोडे यांनी प्रथम सुचना अहवाल नोंदवून घेत भा.दं.वि.चे कलम १८८, ५००, ५०५ १ (ब) व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५४ व साथरोग अधिनियम १८९७ च्या कलम ३ चा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.