आवश्यकतेनुसार २४ तासही उघडी राहतील दुकाने
चंद्रपूर 5 एप्रिल - संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी राज्य शासनाने अन्नधान्य, किराणा व औषधी या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत चालू ठेवण्याचे . तसेच आवश्यकतेनुसार सदर दुकाने २४ तास चालु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे, सर्वत्र जिल्हाबंदी सुद्धा आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये म्हणून शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या संदर्भात केंद्र शासनाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार किराणा दुकाने तसेच औषधी दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहणार आहे.
जीवनावश्यक वस्तु अधिनियम तरतुदीनुसार अन्नधान्य तसेच औषधे यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आलेला आहे. अन्नधान्याची विक्री किराणा दुकानांमधून (Grocery Shops) तसेच औषधांची विक्री औषधांच्या दुकानांमधून ( Pharmaceuticar stores) करण्यात येते. मात्र असे असतानाही काही किराणा दुकाने औषधांची दुकाने (Grocery stores and Pharmaceutical Stores) लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याचे व त्यामुळे सध्या चालू असलेल्या अश्या दुकानांवर विक्रीसाठी अतिरिक्त ताण पडत असल्याचे व त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. या बाबी विचारात घेता या संदर्भात शासनाने सदर निर्णय घेतला आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार किराणा दुकानांच्या बाबतीत पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस तसेच औषध दुकानांच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीसांना देण्यात आले आहेत.