चार वर्षापासून आरोग्य कर्मचारी नाही
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षांपासून आरोग्य सेवक व सेविकेची नियुक्ती नसल्याने इमारत व प्रसूतीगृहाला मरणकळा सोसाव्या लागत आहे. इमारतीची झालेली पडझड व घाणीचे पसरलेले साम्राज्य यामुळे येथील आरोग्य उपकेंद्रच अखेरच्या घटका मोजत आहे .
पाच हजार लोकसंख्या असलेल्या सायगावमध्ये गेल्या तीस वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा सुरू होती. गरजेपुरती पुरेशी आरोग्य उपकेंद्राची इमारत, स्वतंत्र प्रसुती गृह उभारण्यात आले आहे. पूर्वीपासून निवाशी वैद्यकिय सेवक, नर्स यांचे वास्तव्य या इमारतीत असायचे. गेला चार वर्षापूर्वी येथील आरोग्य सेविका सेवानिवृत्त झाल्या, तेंव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीसह आरोग्य प्रशासनाने आरोग्य कर्मचारी नियुक्त केले नाही.
येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत जिर्ण झालेली आहे. पावसाळ्यात गळणारे छत व कर्मचारी राहत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या जीर्ण इमारतीला एक वर्षांपूर्वी रंगरंगोटी करून दुरुस्तीच्या नावाखाली लाख दोन लाखाचा निधी खर्ची करण्यात आला. त्यामुळे " वरून किर्तन आतुन तमाशा " अशीच गत सायगावच्या आरोग्य उपकेंद्र इमारची झाली आहे.
प्रसुती गृह धूळ खात पडून !
दहा वर्षापूर्वी येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात स्वतंत्र प्रसुतीगृहाची इमारत बांधण्यात आली. आजपर्यत या प्रसुतीगृहात एकाही महिलेची प्रसुती झाल्याची नोंद नाही. सुरवातीच्यादोन वर्षात या प्रसुतीगृहात तलाठी कार्यालय थाटले होते. गेल्या चार वर्षापासून निवासी वैद्यकिय सेवक नसल्याने या प्रसुतीगृहातील साधनसामुग्री धूळ खात पडून आहे. अस्ताव्यस्थ पडलेले सामान व भिती,छताला लागलेले जाळे, धूळ ही अनेक वर्षांपासून पडीत वास्तू असल्याची साक्ष देत आहे.
ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतुन आरोग्य सेवकांची नेमणुक करण्यात यावी यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांनी मागणी केली होती. ग्रामपंचायतीने येवला पंचायत समिती, जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करूनही अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली नाही. याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीं यांची बेफिकिरी की, प्रशासनाची उदासिनता असा प्रश्न सायगावकरांना पडला आहे.