येवला प्रतिनिधी / विजय खैरनार
येवला: जिल्हा परिषदेच्या पाटोदा गटाचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनकर यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी निवड झाल्याने येवला येथील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर व बनकर यांचे निवासस्थानी अयोध्या नगरीत फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
या पूर्वी सन १९९७ ते २००२ या काळात संजय बनकर यांचे मामा निवृत्ती पाटील बोरणारे यांनी अर्थ व बांधकाम समिती सभापती पद भूषविले होते. त्यानंतर बोरणारे यांचे भाचे असलेल्या संजय बनकरांनी हे पद मिळवल्याने जिल्हा परिषदेच्या पाटोदा गटाला योगायोगाने का होईना दुसऱ्यांदा अर्थ व बांधकाम समिती सभापती पदाचा बहुमान मिळाला आहे. तर या अगोदर जिल्हा परिषदेचे नगरसुल गटाचे जनार्दन पाटील यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषवितांना शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदावर काम केले आहे. ते पद राजापूर गटाच्या सुरेखा दराडे यांना मिळाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांनंतर सर्वाधिक महत्वाचे खाते अर्थ व बांधकाम हे खाते आहे. हे खाते येवल्याच्या वाटेला आल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कृ उ बा चे माजी सभापती किसनराव धनगे, अरुण थोरात, कृ उ बा संचालक बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, देविदास शेळके, प्रभाकर बोरणारे, अशोक मेंगाने, साहेबराव आहेर, भगवान ठोंबरे, राजेंद्र गायकवाड, लक्ष्मणराव साळुंके, नंदकुमार काळे, पाटोदा गटातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, शेतकरी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांनी बनकर यांचा सत्कार केला