पुणे येथील 35 पर्यटकांची चंद्रपूर ऐतिहासिक वारसास्थळाना भेटी
चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वारसा आहे. ताडोबासह आता हा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना खुणावू लागलेला आहे. याची प्रचिती नुकतीच आली पुणे येथून आलेल्या वसुंधरा टीमने ताडोबा, हेमलकसा सह चंद्रपुरातील किल्ला व ऐतिहासिक वास्तुंची पाहणी करून गोङकालीन इतिहास जाणून घेतला.
इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेले चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान आणि चंद्रपूर किल्ला पर्यटन सुरू केल्याने स्थानिक पर्यटक नागरिक या पर्यटनाचा लाभ घेऊ लागले आहेत. मात्र मागील वर्षी मे महिन्यात इको प्रो स्थेच्यावतीने काढण्यात आलेली महाराष्ट्र वारसा संवर्धन परिक्रमा 'आपला वारसा आपणच जपूया' हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात आला. यादरम्यान राज्यातील तीस जिल्ह्यात फिरून आल्याने येथील स्वच्छता अभियान व ऐतिहासिक वारसा याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यात आली होती. चंद्रपूर, ताडोबा आणि हेमलकसा येथे पर्यटक म्हणून भेट देणारे आता चंद्रपूर शहरातील किल्ला परकोट ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देऊ लागले आहेत.
मंगळवारी पुणे येथील वसुंधरा अभियान टीमच्या 35 पर्यटकांनी ताडोबा, हेमलकसा सह चंद्रपूर शहरात एक दिवस थांबून येथील ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट दिली. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने आज सकाळी हेरिटेज वाॅकमध्ये सहभागी होत गोंडकालीन इतिहास जाणून घेतला.
चंद्रपूर शहरातील किल्ला परकोट, समाधी, मंदिरे हे पाहून पुण्यातील पर्यटक मंडळी भारावून गेली. समृद्ध इतिहास जाणून येथील आदिवासी संस्कृती, वास्तुकला अन्य पर्यटकांनीही चंद्रपूर शहरात थांबून पहावा तसेच ह्या वारसा संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न, याचे त्यांनी कौतुक करीत याप्रकारे महाराष्ट्रात महाराजांचा वारसा असलेले गड-किल्ले यांचे संरक्षण संवर्धन स्थानिक पातळीवर युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
वसुंधरा अभियान टीमचे प्रमुख पांडुरंग भुजबळ यांनी चंद्रपूर शहरातील किल्ले स्वच्छता अभियानचे अनुकरण सर्वत्र होण्याची गरज व्यक्त केली. लोकसहभागातून आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे शक्य आहे, असे सांगत वसुंधरा टीमचे सदस्य तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार रवी घाटे यांनी प्रत्येक ठिकाणचा वारसा हा महत्त्वाचा असून संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले संरक्षण-संवर्धन ची ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. फक्त शिवाजी महाराज की जय असे म्हणून चालणार नाही तर त्याच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वारसा पाहून चंद्रपुरात इतकं सारं काही पाहण्यासारखा आहे हे पहिल्यांदाच कळलं. पुढच्या काळात या ऐतिहासिक स्मारकामुळे चंद्रपूर ची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मत व्यक्त केले
चंद्रपुरात आलेल्या पर्यटकांना इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व कार्यकर्ते यांनी गाईडच्या भूमिकेत संपूर्ण ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती दिली. चंद्रपूर पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा नवीन उपक्रम सुरू आहे. पुढील काळात पर्यटक एक दिवस ताडोबा, एक दिवस हेमलकसा आणि एक दिवस चंद्रपूर अशी भ्रमंती करु शकतील. यातून चंद्रपूरच्या पर्यटन विकासात हातभार लागेल, असे मत यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.
आज आलेल्या पर्यटकांमधे वसुंधरा अभियान बानेर, पुणे चे संजय मूरकूटे, रवि घाटे, ज्योती घाटे, संदिप कामठे, राजेंद्र सूतार, विजय सोमण, अरूणा सोमण, प्रमीला मूरकूटे व अन्य सदस्यांचा सहभाग होता. सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता इको प्रोचे रवि गुरनुले, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, अमोल उट्टलवार, राजेश व्यास, अनिल अदुगुरवार आदींनी सहकार्य केले.