चंद्रपूर - मुल मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना केल्यानंतर देखील संबंधित कंत्राटदाराकडून या कामांमध्ये अतिशय वेळ होत आहे. त्यामुळे काल पुन्हा एकदा अपघात झाला असून ह्या अपघाताला कारणीभूत असलेल्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना यासंदर्भात आज निर्देश देताना त्यांनी या रस्त्याच्या या कामकाजाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून वेळेत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आले. असून हे योग्य नाही, असे देखील पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
काल ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना येथील बंगाली कॅम्प परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. ट्रक आणि दुचाकी स्वार बल्लारपूर वरून मुल जात होते. चौकात मुलच्या दिशेने वळण घेताना ट्रकचा धक्का लागल्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन दोन तरुणांना गंभीर अपघात झाला. या अपघातांमध्ये या तरुणांना कायमचे अपंगत्व आले.
ही बाब अतिशय गंभीर असून केवळ प्रलंबित रस्त्यांच्या कामामुळे अशा घटना घडता कामा नये, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेत अपघात ग्रस्त झालेल्या या तरुणाप्रती पालकमंत्र्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून जिल्ह्यात सुरू असणाऱ्या सर्व प्रलंबित कामाचा लवकरच आपण आढावा घेत असल्याचे म्हटले आहे.