विभागीय क्रीडा स्पर्धेचा जल्लोषात समारोप
चंद्रपूर, दि 4 डिसेंबर : आदिवासी विकास विभाग नागपूरद्वारा आयोजित चार दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचा रंगारंग समारोपीय कार्यक्रम आज जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान चंद्रपूर येथे पार पडला. या पारितोषिक वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. संदीप राठोड अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नागपूर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर हे होते. तसेच चंद्रपूर चे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर, सहायक प्रकल्प अधिकारी निलय राठोड, विकास राचेलवार, सुनील बावणे, नियोजन अधिकारी अभय नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते.
चार दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो खो, व्हॉलीबाल व हॅण्डबाल या सांघिक खेळासह भाळाफेक, थाळीफेक, गोळाफेक, धा वणे व चालणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धा मध्ये भामरागढ़ हा संघ विजेता तर गडचिरोली संघ उपविजेता ठरला आहे.
या सोबतच आयोजित विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम पारितोषिक अहेरीला तर द्वितीय पारितोषिक वर्धा संघाला मिळाले. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम स्थान चिमूर संघाने पटकाविले तर चंद्रपूर संघ उपविजेता ठरला आहे. सर्व विजेता संघाना चषक व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सम्मान करण्यात आले.
यावेळी किकबॉक्सिंग या क्रीडाप्रकारात उल्लेखनीय प्रदर्शन करणाऱ्या रेश्मा कोरचा व सोनाली मज्जी या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी आपल्या मार्गदर्शनात श्री. राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतून संघभावना व खिलाडूवृत्तीचे संवर्धन करताना कठीण परिश्रमातून नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. संदीप राठोड यांनी चार दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धांच्या उत्कृष्ट आयोजनासाठी चंद्रपूर प्रकल्प अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व खेळाडूंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर यांनी केले. संचालन चंद्रशेखर दंदे, किशोर कवठे, उमेश कडू यांनी केले तर आभार निलय राठोड सहायक प्रकल्प अधिकारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, चंद्रपूर चे प्रकल्प समन्वयक उमेश कडू, वासुदेव राजपुरोहित, शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव मडकाम, चैताली किन्नाके, पूर्वा खेरकर, सर्व प्रकल्प समन्वयक क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम केले.