नागपूर/प्रतिनिधी:
जेएनयुच्या संघर्षरत विद्यार्थ्यांवर प्रशासनाला आपल्या हाताशी धरून मोदी सरकार सशस्त्र पोलिसांद्वारे करीत असलेला अत्याचार, विद्यार्थ्यांचे वाहते रक्त आणि विद्यार्थिनींवर पोलिसांकडून होत असलेले विनयभंग यासारखे नीच प्रकार बघून मन सुन्न होत असून जेएनयुच्या विद्यार्थ्यांना नक्षलवादी, देशद्रोही ठरविण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न हा चीड आणणारा असल्याचे मत जेष्ठ विधितज्ञ डॉ ऍड अंजली साळवे यांनी व्यक्त केले.
दैनिक जनतेचा महानायक व इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्तरित्या आयोजित ‘जेएनयु विद्यार्थी आंदोलन’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार शूद्रातिशूद्रांना शिक्षणाचा हक्क नाही अशात कोणी शिकला तर त्या शुद्राचा अंगठा कापला जाण्याचे युग आता इतिहासजमा झाले आहे, आता आम्ही अंगठा देणार नाहीत असे निर्धारपूर्वक सांगत त्या पुढे म्हणाल्या की विद्यार्थ्यांवर अत्याचार व मुलींचा विनयभंग हे संसदेच्या अधिवेशन काळात होत असतांना याविरुद्ध कुठलाही खासदार संसदेत बोलायला तयार नाही, महिला खासदार तरी कशा मौन राहू शकतात? असा प्रश्न उपस्थित करून याविरुद्ध आता बहुजन समाजाने रस्त्यावर येऊन जेएनयुच्या विद्यार्थ्यांसोबत मागासवर्गीयांच्या उच्च शिक्षणाच्या अधिकाराला वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ ऍड अंजली साळवे त्यांनी केले.
प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक देविदास घोडेस्वार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या चर्चासत्रात जेएनयुचे माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर अजय चौधरी, जेष्ठ वकील राजेंद्र पाटील, प्राध्यापक प्रमोद वासनिक व मिलिंद फुलझेले यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी गुणवंत पाटील, बी टी वाहणे, कावळे सुरेश पानतावणे, डॉक्टर सतीश शंभरकर, अभिमन्यू वासनिक, अजय मोहीले, राजू कापले, विलास गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पुर्वी विविध सामाजिक संघटनांतर्फ़े संविधान चौकात जेएनयुच्या आंदोलनकारी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि शिक्षणाचे खासगीकरण व केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात आयोजित आंदोलनात सहभागी होत डॉ ऍड अंजली साळवे यांनी बहुजन समाजाने रस्त्यावर येऊन जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन केले.