महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या प्रयत्नांच्या दिशेने आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत.अश्यातच राज्यातील सत्तास्थापनेसाठी अपक्षांचे स्थान महत्वाचे असणार आहे. याचमुळे भाजपने अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. आज चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्यावर भेट घेतली.
या भेटीचा फोटो सोशल मीडियावर वायरल होऊ लागला आणि या चर्चेला वेगळे वळण मिळाले.अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत फोटो बघितल्यावर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले. सत्तास्थापनेसाठी भाजप व शिवसेनेला आणखी आमदारांची गरज आहे अशाच दोन दिवसा अगोदर जोरगेवार यांच्या भेटीला शोभाताई फडणवीस पोचल्या. शोभाताई या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत. शोभाताईंनी जोरगेवार यांच्या भाजप तिकिटासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. जोरगेवार यांच्याशी भेट विजयासाठी अभिनंदन करण्यासाठी असल्याचे शोभाताईंनी सांगितले आहे.
त्याच्या दुसऱ्या दिवसानंतरच शिवसेनेचे विदर्भातील खासदार कृपाल तुमाने हे जोरगेवार यांच्या भेटीला येऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीवरून मुख्यमंत्र्यांनी जोरगेवार यांना फोन करून भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली त्यांच्या विनंतीला मान देऊन जोरगेवार हे नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असे जोरगेवार यांचे कडून सांगण्यात येत आहे.
जोरगेवार यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोटो बघितल्यानंतर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करतील असे चर्चा शहरात सुरू आहेत,मात्र माझा कोणत्याच पक्षात प्रवेश निश्चित नाही,असे खबरबातशी बोलतांना सांगितले.
मात्र सत्तेच्या बाहेर राहून काम करता येत नाही यामुळे सत्तेत राहून विकास निधी खेचून आणू शकतात त्यामुळे जोरगेवार यांनी सत्तेत जाणे कधीही ही परवडणारे असल्याच्या चर्चा जाणकार हुशार नागरिकांत सुरू आहे. युतीतील दोन्ही पक्षांना एकेक आमदारांची आवश्यकता असल्याने अपक्ष आमदारांना प्रलोभने देणे सुरू आहे.
यात जोरगेवार यांनी सत्तास्थापनेसाठी जर पाठिंबा दिल्याचे ठरवलं तर नेमका कोणत्या पक्षात जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.