भद्रावती तालुक्यातील 8 शेतक-यांना सौर कृषीपंप
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतीपंपासाठी दिवसा विजेचे स्वप्न साकार करणा-या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस शेतकऱ्यांकडून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर परिमंडलातील तब्बल 6 हजार 808 शेतक-यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्राप्त झाले असून सौर कृषिपंप वाटपाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. त्यापैकी भद्रावती उपविभागातील आठ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप संच उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील विमल चिकटे व ईश्वर मत्ते, कढोली गावातील तेजस मडावी, कोतवाल भगत मधील प्रशांत गजभे व रामचंद्र गजभे, किन्हाळा येथील लक्ष्मण मगरे आणि बेळगांव दे. मधील भास्कर गजभे या आठ शेतक-यांच्या शेतात सौर कृषिपंप लावण्यात आले आहेत. शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरणही सर्वत्र करण्यात आले आहे. या कृषीपंपाची वैशिष्ट्ये आनि दिवसा कृषीपंपांना वीजपुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतीला रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा अशी अनेक शेतक-यांची मागणी होती. या योजनेमुळे त्यांची ही मागणी पुर्ण होत आहे.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील अर्ज केलेल्या 6 हजार 808 शेतक-यांपैकी 4 हजार 680 शेतक-यांना आवश्यक शुल्काचे मागणी पत्र देण्यात आले असून त्यापैकी गडचिरोली मंडलातील 504 तर चंद्रपूर मंडलातील 712 अशा एकूण 1216 शेतक-यांनी पैश्याचा भरणाही केलेला आहे. या योजनेच्या निकषांनुसार मागणि पत्र देण्यात आलेल्या उर्वरित शेतक-यांनी आवश्यक शुल्काचा भरणा करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. हरिष गजबे यांनी केले आहे.