नागपूर/प्रतिनिधी:
ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकटामुळे महावितरणच्या उमरेड विभागात येणाऱ्या मकरधोकडा परिसरात या आठवड्यात तब्बल ४० पिन इन्सुलेटर निकामी झाले. महावितरणकडून तात्काळ पावले उचलत ती बदलण्यात आली.
रविवार दिनांक २३ जून रोजी मकरधोकडा परिसरास वादळी पावसाने झोडपले. सोबतच विजांच्या कडकटामुळे महावितरण मकरधोकडा उपकेंद्र ते रेल्वे क्रॉसिंग या १ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात वीज वाहिनीवरील तब्बल १७ पिन इन्सुलेटर निकामी झाले. वीज वाहिनीची तपासणी करून निकामी पिन इन्सुलेटर बदलण्यात महावितरण कर्मचाऱ्यांचा बराच वेळ गेला. सोमवारी दुपारी १२ वाजता येथील वीज पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. सुमारे दोन हजार वीज ग्राहक या काळात अंधारात होते.
सोमवारी पिन इन्सुलेटर बदलून होत नाही तोच दिनांक २६ च्या मध्यरात्री पुन्हा विजांच्या कडकटामुळे याच वाहिनीवरील २२ पिन इन्सुलेटर निकामी झाले. परिणामी पुन्हा या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या उमरेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत आणि शाखा अभियंता अशित सहारे यांनी वीज पुरवठा शक्य तेवढ्या लवकर सुरळीत करण्यासाठी पावले उचललीत. विजांच्या कडकटामुळे निकामी झालेले पिन इन्सुलेटरची तपासणी प्रत्येक वीज खांबावर चढून करावी लागते. नंतर निकामी इन्सुलेटर बदलण्यात येतात. यावेळी तब्बल २२ पिन इन्सुलेटर निकामी झाल्याचे आढळून आले. २६च्या मध्यरात्री ३ वाजता काही पिन इन्सुलेटर बदली करून परिसरातील काही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित वीज ग्राहकांच्या पुरवठा २७ च्या दुपारी सुरळीत करण्यात आला.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शाखा अभियंता अशित सहारे यांच्यासह विदुयत सहायक नचिकेत चौधरी, योगेश कोवे, आशिष हिरडकर, रुपेश रायपूरकर भगवान कोरं, पुरषोत्तम कोवे यांनी मेहनत घेतली.