नागपूर/प्रतिनिधी:
सावनेर शहरातील अपघातप्रवण क्षेत्रात येणाऱ्या लघु आणि उच्चदाबाच्या वीज वाहिन्या महावितरणकडून काढण्यात आल्या असून शहरास अखण्डित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा यासाठी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांनी दिली.
सावनेर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहराचे आकार वाढू लागला आहे. सोबतच नवीन वीज ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. वाढती विजेची मागणी लक्ष्यात घेऊन महावितरणकडून कामाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागात अनेक विकास कामे महावितरणकडून प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
नक्षत्र कॉलनी, चिंचपुरा,नाईक ले आऊट , पाहेलीपार या भागात काही ठिकाणी वीज वाहिन्या धोकादायक परिस्थितीत असल्याचे आढळून आले. महावितरणकडून कामाचे नियोजन करून येथील लघु आणि उच्चदाबाच्या वीज वाहिन्या काढून टाकण्यात आल्या.सटवामाला झोपडपट्टीत वीज ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐरिअल बंच केबल टाकण्यात आल्या आहेत. सावनेर शहरात दोन ठिकणी भूमिगत वीज वाहिन्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. येथील सावनेर पंचायत समिती कार्यालय ते सावनेर महावितरण उपकेंद्र दरम्यात भूमिगत वीज वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे.
धापेवाडा चौक, छिंदवाडा मार्ग आणि पाहेलीपार मार्गावरील वितरण रोहित्रांची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. चिंचपुरा परिसरास अगोदर सिंगल फेस वीज पुरवठा मिळत होता पण आजकाल या भागात थ्री फेस वीज पुरवठा करण्यात येतो आहे. सावनेर रेल्वे स्टेशन आणि पालिया शाळेजवळ असणारे नादुरुस्त रोहित्र महावितरणकडून बदलण्यात आले आहे.
पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याच दृष्टीने वीज वाहिन्यांवर येणाऱ्या फांद्याची छटाई मे महिन्याच्या कालावधीत करण्यात आली.