चंद्रपुर/प्रतिनिधी:
२५ जून २०१९ रोजी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मुख्य कार्यालय प्रकाशगड मुंबई यांच्या विशेष पुढाकाराने ‘टेक्नो ग्रीन एनविरोन्मेन्ट सोल्युशन’ यांच्या मार्फत सदर कार्यशाळा घेण्यात आली.
डॉक्टर अजय ओझा, श्रद्धा बेनोसे व नदीम शेख यांनी हवा, पाणी, घनकचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा पुनर्वापर व विल्हेवाट लावण्यासाठी प्रदूषण मंडळाकडून देण्यात आलेले मार्गदर्शक तत्त्वे व त्यांची तंतोतंत पूर्तता करण्यासंबंधी जागरूकता, शंका निवारण, विशिष्ट वेळेत करावयाची पूर्तता यासंबंधी उपयुक्त मार्गदर्शन केले.
पर्यावरणपालन करण्यासंबंधी सर्व अभियंता, रसायनशास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ रसायन शास्त्रज्ञ माया डफाडे व आभार प्रदर्शन कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ दौलत शिवणकर यांनी केले.
याप्रसंगी मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंते मधुकर परचाके, राजेशकुमार ओस्वाल, राजेश राजगडकर, अधीक्षक अभियंते चंद्रदीप डांगे, दत्तात्रय सुरजुसे, अनिल काठोये, अनिल पुनसे, पुरुषोत्तम उपासे, सुहास जाधव सुनील कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.