शाश्वत वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना
नागपूर/प्रतिनिधी:
मे. एसएनडीएल क्षेत्रातील ग्राहकांना शाश्वत, अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी येत्या 15 दिवसांत कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना महावितरणचे संचालक (संचलन) श्री दिनेशचंद्र साबू यांनी शुक्रवार (दि. 10 मे) रोजी घेतलेल्या आढावा बैठकीप्रसंगी दिल्या. यावेळी श्री साबू यांनी मे. एसएनडीएल क्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासकार्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि आढावाही घेतला.
मे. एसएनडीएल क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक 15 दिवसांत महावितरण आणि मे. एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिका-यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सुचना करतांनाच श्री साबू यांनी वर्षभरातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात यावे, आयपीडीएस, कॅपेक्स, जिल्हा नियोजन योजनेंतर्गत मंजूर कामांची विस्तृत माहिती घेतली. अपघात प्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत करण्यात याव्यात.
वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पुर्वसुचना ग्राहकांना देण्यात यावी, सोबतच एका वाहिनीवर एका महिन्यात केवळ एकदाच आऊटेज घेण्यात यावा, या भागातील ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठयाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी उपकेंद्रांना वीजपुरवठ्याचा अतिरिक्त स्त्रोताची उपलब्धता करून देण्यात यावे, सर्व उपकेंद्रे एकमेकांशी जोडण्याचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, उपकेंद्रातील अति भारीत वीज रोहीत्राच्या ठिकाणी वाढिव क्षमतेची वीज रोहीत्रे तात्काळ बसविण्यात यावी, सोबतच प्रलंबित वीज जोडण्या त्वरीत देणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणा-या भागातील बिघाडांचे विश्लेषण करून ते टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही श्री साबू यांनी यावेळी केल्या.
यावेळी सोनल खुराणा यांनी मे. एसएनडीएलच्या कामाबाबत विस्तृत सादरीकरणामार्फ़त कंपनीच्या एकूणच कामकाजाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. उपकेंद्रांवरील भार कमी व्हावा यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी, वीजचोरीचे आणि वीज अपघातांचे प्रमाण अधिक असलेल्या भागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप घुगल, अधिक्षक अभियंते सर्वश्री उमेश शहारे, दिलीप दोडके, नारायण आमझरे, मे. एसएनडीएलतर्फ़े राजेश तुरकर, दिपक लाबडे, शेषराव कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीपश्चात श्री साबू यांनी मे. एसएनडीएलचे सेमिनेरी हिल्स उपकेंद्र, जयहिंद उपकेंद्र, ग्राहक सुविधा केंद्र, कॉल सेंटर या ठिकाणी भेट देत तेथील कामांची पाहणीही केली.