नागपूर /अरूण कराळे -
नागपूर जिल्हा परिषद मधील १३ पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या मिळालेल्या पावत्यांमध्ये शेकडो शिक्षक व केंद्रप्रमुखांच्या खात्यात मासिक वर्गणी शून्य कपात झाल्याचे नमूद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पेपर मध्ये भोपळा देणाऱ्या शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी पावती मध्ये भोपळा मिळाल्याने आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.याबाबत संबंधित शिक्षकांनी लेखा व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना भेटून चौकशी केली असता वेतनातून कपात करण्यात आलेल्या रक्कमेची शेड्युल अप्राप्त असल्याचे सांगितले जाते.दुसरीकडे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना विचारले तर आमच्याकडुन नियमितपणे शेड्युल जिल्हा परिषद कडे पाठविण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
पंचायत समिती व जिल्हा परिषद लेखा विभागाचे बेजबाबदारपणामुळे शिक्षकांना मनःस्ताप होत असून शिक्षकांना आपल्याच खात्यातून कर्ज/अग्रीम घेतांना प्रचंड त्रास होतो.जिल्हा परिषदकडे गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेने भविष्य निर्वाह निधीच्या पासबुकची मागणी करण्यात आली असून खात्यातून कर्ज किंवा अग्रीम मंजुरी करीता ऑनलाईन अर्जाची सुविधा निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष शरद भांडारकर यांनी दिली आहे .