प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात राष्ट्रीय विज्ञानदिन
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:
निसर्गातील न सुटलेले प्रश्न मानवी मनात गूढ बनून राज्य करतात. याचा रोजच्या जीवनमानावर अनुचित प्रभाव पडत राहतो आणि यात सर्वसामान्य भरडले जातात. मात्र जसजसे नैसर्गिक घटनांमागील विज्ञानाचे आकलन होत जाते तसतसे मानवी मन कणखर होण्यास मदत होते. आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतांना सर्वसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता सुदृढ होणे हे एक मोठे आव्हान आहे. विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेला एक परीस आहे . असे प्रतिपादन स्व .प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाच्या संचालक सदस्या मीनाक्षी घोडखांदे यांनी केले .
दत्तवाडीतील स्व .प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्ताने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अर्चना डायगव्हाणे तर प्रमुख पाहूणे म्हणून मुख्याध्यापिका प्रज्ञा चौधरी होत्या .विज्ञान प्रदर्शनीमध्ये वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यानी बेसीक सायन्स तत्वावर आधारित अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तुंपासून बनवलेल्या उपकरणांची मांडणी करण्यात आली होती .भौतिकशास्त्रज्ञ दिवंगत चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रामन परिणाम हा प्रकाशाच्या गुणधर्माबाबतचा शोध जाहीर केला त्यासाठी त्यांना पुढे १९३० मध्ये विज्ञानाचे नोबेल पारितोषिकही मिळाले.
२८ फेब्रुवारी हा दिवस भारतात १९८७ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात आहे अशी माहीती मुख्याध्यापिका अर्चना डायगव्हाणे यांनी अध्यक्षस्थानावरून दिली .विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनासाठी गणेश श्रीखंडे , हाफ़ीसा बेगम , मंजुषा भोसे , अनील ठाकरे , योगेश्वर दांडेकर , सवीता वाडेकर , रेखा गिरी , सीमा गेडाम, कल्पना उईके, सुलोजना घुटे , अशविनी राठोड ,राकेश पंत आदींनी सहकार्य केले.