गणित भाषा विषयाने टाकली गुगली तर बुद्धिमत्ता,
इंग्रजी लई भारी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
अण्णापूर (वार्ताहर ):
स्पर्धा परिक्षेचा पाया मानली जाणारी शिष्यवृत्ती परिक्षा आज शिरुर तालुक्यातील कारेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरळीत व कोणत्याही अनुचित प्रकार न घडता संपन्न झाली. सदर परिक्षेत मराठी माध्यमाच्या 228 व इंग्रजी माध्यमाच्या 24 अशा एकुण 252 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी मराठी माध्यमाच्या 222 व इंग्रजी माध्यमाच्या 24 अशा 246 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परिक्षेकरीता निमगाव म्हाळुंगी केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास विश्वास यांनी केंद्रसंचालक तर सहाय्यक म्हणून संतोष वेताळ यांनी काम पाहिले. सदर परीक्षेकरीता कारेगाव केंद्रातील 12 माध्यमिक शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. सदर परीक्षा गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी अत्यंत अत्यंत काटेकोर नियोजन केल्याने उत्साहाने व सुरळीत संपन्न झाली. दरम्यान परीक्षा काळावधीत सदर केंद्राला कळमकर यांनी भेट देवुन परीक्षेचा आढावा घेतला. त्यांच्या समवेत पंचायत समितीचे विषयतज्ज्ञ प्रदिप देवकाते हे होते.
सदर परीक्षा सुरु होण्यापुर्वी केंद्रसंचालक विश्वास , पदवीधर शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष त्रिंबक भाकरे, ब्रिटिश कौन्सिलचे राज्य मार्गदर्शक ज्ञानेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व पालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कारेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा खैरे व ढोकसांगवी शाळेचे तांत्रस्नेही शिक्षक राजु कर्डीले यांनी केली. दरम्यान वर्षभर परीश्रम घेऊन या परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यावर एकच जल्लोष केला.
या परीक्षार्थींबरोबर चर्चा केल्यानंतर प्रभात प्रतिनिधीशी बोलताना मराठी व गणित विषयाने गुगली टाकली असुन इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाचा पेपर लई भारी असल्याच्या प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या . एकंदरीत या परीक्षेत परत एकदा शिरुर तालुक्याचा डंका राज्यात वाजणार असल्याचे तालुक्यातील अनेक शिक्षकांशी बोलताना स्पष्ट झाले. विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे चीज होणार यात तिळमात्र शंका नाही