प्रदुषण विभागावर काढला धडक मोर्चा
नागपूर / अरुण कराळे:
नागपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सोनेगांव ( निपाणी )अंतर्गत एमआयडीसी भागात संदीप मेटल कंपनीतून उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर सोडत असलेल्या रसायनयुक्त विषारी पाणी परिसरातील जनावरे पिल्याने मोठ्या प्रमाणात दगावली असून सर्वसामान्य स्थानिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीची झळ पोहचली आहे त्यामुळे कंपनी मालक व शासनाच्या उदासीन धोरण विरोधात हिंगणा विधानसभा युवक कॉग्रेसतर्फे बुधवार १३ फेब्रुवारी रोजी संदीप मेटल कंपनीजवळ धरणे व निर्देशने आंदोलन करुन प्रदुषण विभागावर धडक मोर्चा काढण्यात आला . मोर्चाचे रुपांतर बैठकीत करण्यात येऊन प्रदुषण विभागाचे मुख्य अधिकारी रा .व. वानखडे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले .पंधरा दिवसात हा गंभीर प्रश्न सोडला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा हिंगणा विधानसभा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी दिला आहे .
एमआयडीसी येथील संदीप मेटल कंपनीतर्फे रसायनयुक्त पाणी सोडत असल्याने आज पर्यंत परिसरातील शेकडोच्या वर जनावरे दगावली असून कंपनी जवळील गावाचे पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होत असल्याने येथील रहिवासी विविध आजाराच्या विळख्यात येण्याची भीती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे.
याबाबत त्वरित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी एक महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण विभाग ,जिल्हाधिकारी,जिल्हा कार्यपालन अधिकारी,खंडविकास अधिकारी,कंपनी व्यवस्थापन,पोलीस विभागाला, युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी निवेदन देऊनही काहीही कारवाई न झाल्यामुळे हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस,नागपुर तालुका काँग्रेस कमेटी तसेच सोनेगाव ग्राम पंचायत प्रशासनातर्फे उदासीन शासनाविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या कुंदा राऊत,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस, सदस्य विनोद लंगोटे,सरपंच शशिकला चाफले यांच्या नेतृत्वात कंपनी विरोधात मोर्चा काढून धरणे आंदोलन करीत शासनाविरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला.
यावेळी नागपूर तालूका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे,अनिल पाटील,भीमराव कडू,वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने ग्राम पंचायत सदस्य सुशिला भिवनकर,नंदा गडेकर,किरण सिंग,विजय सोनकांबळे, हेमलता सरीन, राजू मिश्रा,विजय शुक्ला ,आशुतोष उपाध्याय,किशोर नागपूरकर,शुभम पांडे,योगेश कूमकूमवार,पंकज फलके,निकेश भागवतकर,गणेश बावने,पियुष बांते,मिथून वायकर,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.