कला वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या संमेलनात यांची निवड
मायणी ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)दि. 11 : येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ११व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यक नामदेव माळी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. महाविद्यालय प्रतिवर्षी 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमाखाली साहित्य संमेलन घेत असते. यापूर्वी दहा ग्रामीण साहित्य संमेलने झाली असून त्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. द. ता. भोसले, वसंत केशव पाटील, प्रमोद कोपर्डे, डॉ.बाबुराव गुरव, कवी एकनाथ पाटील, कवी गोविंद पाटील यांनी आपला ठसा उमटविला आहे.
साहित्यिक नामदेव माळी हे गटशिक्षणाधिकारी म्हणून मिरज येथे कार्यरत आहेत. विद्यार्थी व शिक्षक लिहिते व्हावेत यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा, संमेलने भरविली आहेत. त्यांचे 'तरवाड', 'आभाळदाणी', 'शंभर टक्के निकाल' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच 'छावणी' व 'खरडछाटणी' या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. याशिवाय 'शाळाभेट', 'चला लिहूया या' पुस्तकांमधून शिक्षण क्षेत्रात धडपडणारे शिक्षक व विद्यार्थी यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचा उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ निर्मिती पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा उत्कृष्ट कथा/कादंबरी पुरस्कार, संगमनेरचा अनंत फंदी साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते उत्कृष्ट वक्ते व स्तंभलेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
११वे ग्रामीण साहित्य संमेलन शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी रोजी होत असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे असे समन्वयक डॉ. श्यामसुंदर मिरजकर व प्रा. शिवशंकर माळी यांनी सांगितले. या संमेलनात साहित्य रसिक व नवोदित लेखक कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.