रमेश माहूरपवार/मूल
वनजमिनीवर वर्षानुवर्ष शेती करून कुटुंबाचा उदरभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा हक्काचे पट्टे देण्यात शासन यंत्रणेचा टोलवाटोलवी विरोधात आम आदमी पार्टी आणि मूल तालुका युवक बिरादरी संघटना यांनी संयुक्तपणे बुधवारी शेतकरी मोर्चाचे आयोजन केले आहे.
स्वातंत्र्यपूर्वी पासून चंद्रपूर जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो भूमीहीन शेतकरी वनजमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. यातील अनेकांकडे शेती शिवाय कुटुंबाचा पालनपोषणासाठी दुसरे साधन नाही. वर्षानुवर्ष शेती करून उत्पन्न घेत असलेल्या जमिनीचे हक्काचे पट्टे मिळविण्यासाठी जबरानजोत शेतकरी संघर्ष करीत आहे. परंतु कोणत्याही पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा या मागणीला गांभीर्याने घेतले नाही. शासनकर्त्याच्या शेतकऱ्यांप्रतीचा उदासीन धोरणामुळे वनजमिनीवरिल अतिक्रमणाबाबत शासन न्यायालयापुढे शेतकऱ्यांची बाजु भक्कमपणे मांडण्यात कुचराई करीत आहे. शासनाच्या या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जबरानजोत शेतकऱ्यांविरोधात निकाल दिला आहे. न्यायालयाचा निर्णय आणि शासनयंत्रणेचा शेतकरी विरोधी धोरणाबाबत जाब विचारण्यासाठी मूल तालुका आम आदमी पार्टी आणि मूल तालुका युवक बिरादरी संघटना यांनी संयुक्तपणे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी भव्य शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात जबरान जोत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या न्याय्य हक्काचा मागणी साठी लढा ऊभारावा असे आवाहन आयोजकांनी केला आहे