प्रियदर्शिनी सभागृहात सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित
राहण्याचे मुनगंटीवार यांचे आवाहन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाला व समृद्ध इतिहासाला साजेसा माता महांकाली मंदिराचा विकास आराखडा तयार होत आहे. मंदिराच्या मूळ गाभ्यात कुठलाही बदल न करता, भाविकांना सुविधा व महाराष्ट्रातील अन्य नामवंत तीर्थ क्षेत्राप्रमाणे महांकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तथापि, या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना, नव्या कल्पना ऐकण्यासाठी 14 फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ९ या वेळामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यापेक्षा अतिशय आकर्षक व नयनरम्य विकास आराखडा महांकाली मंदिराचा तयार करण्यात आला आहे. या कामाला सुरुवात होण्यापूर्वी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या ऐतिहासिक मंदिराच्या विकासामध्ये आणखी काय सुधारणा करायच्या किंवा उपायोजना काय करायचा यासाठी गुरुवारी 14 फेब्रुवारीला सायंकाळी 6 ते 9 या कालावधीमध्ये खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
सुरुवातीला राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात येईल. त्यानंतर यामध्ये काही सुधारणा करायच्या असल्यास त्याबाबतच्या लेखी सुधारणा यावेळी स्वीकारल्या जाणार आहेत.
जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये असणाऱ्या नागरिकांच्या अनुभवांचा तसेच भाविकांच्या सूचना देखील स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील नामवंत वास्तुविशारद ,अभियंते तसेच मंदिर निर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील यासाठी आपल्या सूचना लेखी स्वरूपात तयार ठेवाव्यात अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
संपूर्ण विदर्भात चंद्रपूरचा नावलौकीक वाढेल अशा पद्धतीचा मंदिराचा विकास आराखडा अंतिम करायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली सूचना नेमकी, नेटकी आणि चंद्रपूरच्या नावलौकिकात भर घालणारी असावी, याकडे लक्ष वेधावे असेही कळविण्यात आले आहे.
हा विकास आराखडा माता महांकाली मंदिराचा असल्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांनी, विचारवंतांनी, लेखक, पत्रकार, विधिज्ञ, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ तसेच पर्यावरण, ऐतिहासिक वारंशाबाबत काम करणाऱ्या सर्व नागरिकांनी, तज्ञांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व धर्म, पंत, समुदायाच्या मान्यवरांना सादर आमंत्रित करण्यात येत असल्याबाबतही कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रियदर्शनी हॉलमधील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन करण्यात आले आहे.