वाडी नगरपरिषद महिला बाल कल्याण विभाग
पुरस्काराने लहान बालकांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
वाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती द्वारा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रथमच वाडी भागातील अंगणवाडीतील पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना आपल्या सुप्त गुणाद्वारे कला प्रस्तुत करण्याची संधी महिला व बालकल्याण सभापती कल्पना सगदेव यांनी प्राप्त करून दिली .
दत्तवाडी येथील सदाचार सोसायटी भवन मध्ये शनिवार ९ फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलनाचे उदघाटन वाडी नगरपरिषदचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्या हस्ते व माजी उपाध्यक्ष नरेश चरडे, पाणी पुरवठा सभापती नीता कुणावार,आरोग्य सभापती शालिनी रागीट, उपसभापती आशा कडू, नगरसेवीका सरीता यादव ,नगरसेवक केशव बांदरे,आशिष नंदागवली,रेखा लीचडे,दीपाली जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले .
यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता महंत,बालरोगतज्ञ डॉ.संदीप यादव यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना स्वास्थ मार्गदर्शन व शासकीय योजनाची माहिती दिली .वाडी नगर परिषद भागातील ३१ अंगणवाडीच्या शिक्षिकेनी वयोगट ३ ते ५ वर्ष गटातील बालकांना वेशभूषा सह तयार करून विविध सामूहिक व वैयक्तिक स्तरावर नृत्य,लघुगीत,कविता सादर केल्या .प्रथमच स्टेजवर येणाऱ्या बालकांचे सुप्त गुण पाहून अतिथी व पालकांनी मनसोक्त आनंद लुटला .सर्व सहभागी बालकांना वाडी नगर परिषद महिला व बाल कल्याणा विभागा तर्फे बिस्कीट,मिठाई , पुष्पगुच्छ व पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले . हे पुरस्कार मिळताच या लहान बालकांचे चेहऱ्यावर हसू उमटून आले .
सांस्कृतिक कार्यक्रमात बालकांचा उत्साह वाढविण्यासाठी भाजपा महिला आघाडी वाडी मंडळ अध्यक्ष ज्योती भोरकर,नंदा कदम,चंद्रप्रभा खोब्रागडे ,नगर परिषदच्या महिला अधिकारी अभियंता अश्वलेखा भगत ,पल्लवी हुमने ,अंगणवाडी शिक्षिका, माता पालक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्तावीक सभापती कल्पना सगदेव ,संचालन माजी बाल कल्याण सभापती नगरसेविका सरिता यादव, आभारप्रदर्शन पल्लवी हुमने यांनी केले.