मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना कमी पैसे भरावे लागणार
'महावितरण आपल्या दारी' योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेत वीजजोडणी मिळणार
नागपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. तसेच महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभागी होता येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे ६४ हजार ९३८ शेतकऱ्यांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकऱ्यांना कोटेशनही देण्यात आले आहेत.
महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला होता अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरुपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
शासनाने मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषिपंपाची किंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसीपंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार व ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार होती.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० एवढी रक्कम भरावी लागत होती ती रक्कम आता अनुक्रमे २४ हजार ७१० व १२ हजार ३५५ एवढी रक्कम भरावी लागणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी सुमारे ५३३ शेतकऱ्यांनी पैसे भरले असून लवकरच या शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाद्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in/solar या महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.