भद्रावती येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन मेळाव्याचे शानदार आयोजन
चंद्रपूर दि 20 फेब्रुवारी : शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विविध धोरणांमार्फत तर तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा ठेवून राज्य शासन विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करीत आहे. शेतकऱ्यांना जोडधंद्याची साथ देत आहे. त्यामुळे आगामी काळात शेती मजबुरीचा नाही तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा,अशी अपेक्षा आज भद्रावती येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन मेळाव्यामध्ये राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी आम्ही उपलब्ध करून मात्र जोडधंदा करून तुम्ही देखील आर्थिक उन्नतीसाठी सिद्ध व्हा,असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन मेळाव्याचे आयोजन भद्रावती येथे बुधवार 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील शहीद बाबा अली यांच्या शेतातील मैदानावर करण्यात आले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. तर राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तेमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
या मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आ. नानाभाऊ श्यामकुळे, आ. बाळू धानोरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बांधकाम व अर्थसभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अर्चना जीवतोडे मेळाव्याच्या स्वागताध्य होत्या. त्यांच्या मार्गदर्शनात भद्रावती वरोरा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती लावली होती.
या शानदार आयोजनाचे कौतुक करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकाराने विचारल्यावर आपण एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले होते की, या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा असेल. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना गेल्या चार वर्षात राबविण्यात आल्या आहेत. त्यांनी भद्रावती येथील ऑडनन्स फॅक्टरीचा उल्लेख करत हे शहर 'जय जवान जय किसान ' घोषणेसाठी संयुक्तिक असून दारूगोळा पुरवणाऱ्या या शहराने आज या मेळाव्यातून शेतकऱ्यांना बळकटी दिली असल्याचे सांगितले.
राहुरी कृषी विद्यापीठातील पाच एकरांमध्ये करण्यात आलेल्या शेतीच्या प्रयोगाबाबत त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना माहिती दिली. ते म्हणाले की, शेती करायची असेल आणि ती फायद्याची करायची असेल तर शेतीमध्ये यांत्रिकीकरण व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. दुसरा अनिवार्य पर्याय म्हणजे शेतीला जोडधंदा देखील असल्याशिवाय शेती फायद्यामध्ये राहू शकत नाही. राहुरी विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये 66 टक्के उत्पादन हे जोडधंद्यातून मिळत असल्याचे पुढे आले आहे. कृषी विद्यापीठाचे ज्ञान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आले पाहिजे. यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी महाविद्यालय उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दुग्धव्यवसाय हा उपयुक्त असून या संदर्भातील पशुसंवर्धनाचे मोठे अभ्यास केंद्र जिल्ह्यात उभे राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना देखील आर्थिक बळकटी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्हयात अनेक बंधारे, बॅरेज उभे होत आहे. सोबतच जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शेत विहिरी देण्याची मोहीम राबविण्यात येत असून या विभागातील एकही शेतकरी इलेक्ट्रिक कनेक्शन पासून वंचित राहू नये, असे आवाहन आपण ऊर्जा मंत्र्यांना केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळामध्ये शेती हा मजबुरीचा मजबुतीचा व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात शेवटी केली.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केंद्र व राज्याच्या अनेक योजना शेतीसंदर्भात असून त्या सर्वच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर शाश्वत सिंचन ही उपाययोजना शोधून काढली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना सुरू करण्यात आली.
ते म्हणाले की, केंद्र शासन अनेक योजना सुरू करत असताना शेतीसोबत जोडधंदा केल्याशिवाय विकास होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या बॅरेजेसच्या माध्यमातून या परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र हे होत असताना जोडधंदा मात्र करण्यासाठी तुम्हाला पुढे यावे लागेल. यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांशी संबंधित असून शेतकऱ्यांची तुर घरात राहू नये, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनाप्रमाणे भाव मिळावा,यासाठी आयात-निर्यात धोरणामध्ये बदल केंद्र शासनाने केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्य शासनाने एकाच वेळी केलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा देखील उल्लेख केला. शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी सुरू राहील ,असे देखील सांगितले. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करावे. प्रत्येक शेतकऱ्याकडे कुठला ना कुठला तरी जोडधंदा असावा ,असे कळकळीचे आवाहन केले.
यावेळी आमदार बाळू धानोरकर यांनी देखील संबोधित केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमार्फत त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या प्रयोगाच्या यशकथा त्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्या. शेतीमध्ये कसून मेहनत आणि नवनवीन प्रयोग केल्यास यांत्रिकीकरणाची कास धरल्यास, शेती घाट्यात राहत नाही. त्यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाला लक्षात घेऊन आपण सुद्धा शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील या यावेळी संबोधित केले. गेल्या चार वर्षात जिल्हा परिषदेला जवळपास 1300 कोटी रुपये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले .जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सभापती अर्चना जिवतोडे यांनी केले .
वरील मान्यवरांसोबतच यावेळी व्यासपीठावर भद्रावती पंचायत समितीच्या सभापती रोहिणी देवतळे, पोंभुर्णा येथील पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, नरेंद्र जीवतोडे, राहुल सराफ ज्योतीताई वाकडे, राहुल संतोषपवार, विद्या किन्नाडे, कमलाबाई राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार व प्रशांत कराडे यांनी केले. विविध प्रजातीच्या पशुधनाची उपलब्धता या प्रदर्शनीचे वैशीष्टय होते. मोठया संख्येने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनीला उपस्थिती लावली होती.