Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ०५, २०१९

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:


केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे दरवर्षी औष्णिक व जल विद्युत क्षेत्रात सर्वोत्कृष्ट/उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात येते. नुकतेच केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाच्या वर्धापन दिनी ४ जानेवारीला महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचा सन २०१९ चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्कोप कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.महानिर्मितीच्यावतीने  संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी आंध्रप्रदेशचे सिंचन व लाभक्षेत्र विकास मंत्री देविनेनी उमा महेश्वरराव, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव अजय कुमार भल्ला, केंद्र सरकारच्या जल संसाधन नदी विकास गंगा शुद्धीकरणचे सचिव यु.पी. सिंग, केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचे अध्यक्ष एस. मसूद हुसेन, सचिव व्ही.के. कांजीलीया तसेच देशभरातील विविध सार्वजनिक उपक्रम, राज्य विद्युत मंडळे व संस्थांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
cstps chandrapur साठी इमेज परिणाम


चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने मागील तीन वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाकडे पाठविली होती. औष्णिक वीज उत्पादनाच्या राष्ट्रीय कार्याची दखल घेत उच्चस्तरीय परीक्षकांनी या पुरस्काराची निवड केली. 
संच देखभाल दुरुस्तीची कामे नियोजित वेळेच्या आधी करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व किफायतशीर दरात वीज उत्पादन करणे, वीज उत्पादनातील तांत्रिक परिमाणे/निकषांवर नियंत्रण ठेवणे, कार्यक्षमतेत अधिक वाढ करण्यासाठी तांत्रिक सुधारणा व अभिनव संकल्पना राबविणे, मनुष्यबळ प्रशिक्षण व विकास, पर्यावरणभिमुख उपक्रम, पाण्याचा पुनर्वापर, काटकसर/बचत,पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून वीज उत्पादनाचा समतोल राखणे, सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत नवनवीन उपक्रम इत्यादी उल्लेखनीय कामांचा यामध्ये समावेश आहे.  
सदर पुरस्काराबद्दल अरविंद सिंग,प्रधान सचिव (ऊर्जा) तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांचे अभिनंदन केले आहे.  सदर पुरस्काराने महानिर्मितीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून हा सांघिक कार्याचा परिपाक असल्याचे गौरवोद्गार संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी काढले तर या पुरस्कारामागे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचे योगदान असल्याचा सार्थ अभिमान मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी व्यक्त केला.

 राज्य शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार महानिर्मिती विविध पातळ्यांवर भरीव कामगिरी करीत आहे. संचालक पाच सूत्री कार्यक्रम, माझी महानिर्मिती-माझे योगदान, पोल या सारखे संवादात्मक उपक्रम प्रभावी ठरले आहेत. तर कोळशाचे व्यवस्थापन, दुष्काळी परिस्थितीत पाणी बचत,पुनर्वापर,पाण्याचे व्यवस्थापन करून वीज उत्पादन कायम ठेवल्याने चंद्रपूर वीज केंद्राच्या कार्यक्षमतेत अधिकची भर पडली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.