प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
नागपूर दि 21 : कोराडी परिसरातील महाजेनकोच्या अतिरिक्त 169 हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीसंदर्भातील संपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी येत्या 15 दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
नागपूर सुधार प्रन्यासच्या सभागृहात टेक्स्टाईल पार्क संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए), महाजेनको, वस्त्रोद्योग संचालनालय व औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त व सभापती श्रीमती स्नेहल उगले, वस्त्रोद्योग संचालक डॉ. श्रीमती माधवी खोडे, महाजेनकोचे मुख्य अभियंता अभय हरणे, अनंत देवतारे, कार्यकारी संचालक शिरुडकर, महाजेनचे संचालक सुधीर पालिवाल, अधीक्षक अभियंता एस. एच. गुज्जेलवार, महाव्यवस्थापक अजय रामटेके आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाजेनकोच्या कोराडी येथे अतिरिक्त 169 हेक्टर जागेवर टेक्स्टाईल पार्क उभारण्यासंदर्भात नागपूर महानगर विकास प्राधिकरण ही नोडल एजन्सी म्हणून राहणार असून टेक्स्टाईल पार्कसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आदी बाबींची पूर्तता करुन येत्या 15 दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, टेक्स्टाईल पार्कसंदर्भात वस्त्रोद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महाजेनकोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधासंदर्भात महानगर आयुक्तांनी बैठक घेवून संपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असेही या बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगितले.
गांधीबाग परिसरातील व्यावसायिक तसेच उद्योजक यांना टेक्स्टाईल पार्क येथे जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच सर्व उद्योजकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील व एकाच ठिकाणी विविध उत्पादन तयार व्हावे, ही टेक्स्टाईल पार्क सुरु करण्यामागची भूमिका असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी सांगितले.
महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त श्रीमती स्नेहल उगले यांनी कोराडी येथील प्रस्तावित टेक्स्टाईल पार्कसंदर्भात माहिती दिली. टेक्स्टाईल पार्कच्यासंदर्भात सर्व संबंधित विभागाची बैठक घेवून आराखडा तयार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कुंभार समाजाला येत्या रविवारी फ्लाय ॲशसाठी जागा
नागपूर शहरात नागपूर सुधार प्रन्यास तसेच शासनाच्या जागेवर विटभट्टीचे काम करणाऱ्या कुंभार समाजाला फ्लाय ॲशचा वापर करुन विटा तयार करण्यासाठी कोराडी येथील महाजेनकोच्या परिसरात विशेष तयार करण्यात आलेल्या झोनमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कुंभार समाजातील 400 विटभट्टी उत्पादन करणाऱ्या उद्योजकांपैकी पहिल्या टप्प्यात येत्या रविवारी 80 जागेचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणाऱ्या राखेवर विटभट्टी व्यवसाय करता यावा यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आमदार कृष्णा खोपडे यांच्या सूचनेनुसार येत्या रविवारी लॉटरी पद्धतीने जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यापूर्वी शासनाच्या जागेवर असलेल्या विटाभट्टीच्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कुंभार समाजाला फ्लाय ॲशचा वापर करुन विटाभट्टीसोबतच इतर पारंपरिक व्यवसाय करता यावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली. शहरातील इतर भागातील विटभट्टया धारकांना कोराडी परिसरात जागा देवून तेथे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध होईल, असेही यावेळी सांगितले.
महालक्ष्मी कोराडी मंदिर परिसरात बसडेपो
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे सुलभ व्हावे, यादृष्टीने बसडेपोचा विकास करण्यात आला आहे. ही जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
बसडेपोच्या देखभाल व दुरुस्तीसोबतच स्वच्छतेसंदर्भातील करार एनएमआरडी व महानगरपालिकेने केल्यानंतर ही जागा हस्तांतरित करावी, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ताजबाग विकास आराखड्याला गती
ताजबाग येथे मोठ्या संख्येने मध्य भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी 132 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून विकास आराखड्यानुसार बहुतांशी कामे पूर्ण झाली असून या कामांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ताजबाग ट्रस्टने पुढाकार घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. ताजबाग परिसरातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यामध्ये सरायचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी साडेसात लाख लिटर टाकीचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. या परिसरात 60 कोटींचे काम पूर्ण झाले असून 42 कोटी रुपयांच्या निविदानुसार कामांना सुरुवात झाली आहे. पूर्ण झालेले काम हस्तांतरित करण्यात आले असल्याचे पालमंत्र्यांनी सांगितले.