Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०४, २०१९

11 ते 15 जानेवारीला जिल्हा कृषी प्रदर्शनी व सरस महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या मालाला खरेदी करण्यासाठी, शेती करण्यास उत्सुक असणाऱ्या नवतरुणांना यांत्रिक ज्ञान संपादन करण्यासाठी आणि जिल्ह्यातील बचत गटांच्या हजारो महिलांनी तयार केलेल्या विविध उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी 11 ते 15 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हा कृषी व सरस महोत्सव तसेच सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला स्वयंसहायता समूह वस्तूंची विक्री व प्रदर्शनी लागणार आहे. प्रशासनाने यासाठी तयारी सुरु केली आहे.

मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनीचा लाभ जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी घ्यावा. याठिकाणी कृषी व त्यावर आधारित व्यवसाय, जोडधंदा, यांत्रिकीकरण याबद्दलच्या माहितीचे अनेक दालन तसेच महत्वाचे चर्चा संवाद देखील आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात शेती आहे किंवा ज्यांना शेतीशी ज्यांचा संबंध आहे. अशा सर्वांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

गृहिणीपासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि बागायतदारापासून तर कोरडवाहू शेती सांभाळणाऱ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीच्या ज्ञान व तंत्रज्ञानाची उपलब्धता या कालावधीत चांदा क्लब मैदानावर राहणार आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाची नोंद आत्ताच आपल्या नियोजनात करावी, असे आवाहनही उदय पाटील व चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.

सदर महोत्सवात आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर असणार आहे. जिल्ह्यातील सर्व शीर्ष नेतृत्व या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असेल. यासोबतच या प्रदर्शनीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य शिक्षण विद्यापीठ नागपूर कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

जिल्हा कृषी व सरस महोत्सव, सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला स्वयंसहायता समूह आधारे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात एकूण 274 स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. शेतीचे साहित्य, तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रसामुग्री यासोबतच कृषी निविष्ठा, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या महिला स्वयंसहाय्यता गटांच्या मार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री दालन,सेंद्रिय शेती व बचत गटांमार्फत उत्पादीत बचत गटाचे दालन, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन, जलयुक्त शिवार, सेंद्रिय शेती, मधुमक्षिकापालन, पशुसंवर्धन, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय आदींच्या प्रात्यक्षिकांच्या तंत्रज्ञानाची मांडणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच यशस्वी शेतकरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ, विचारवंत यांच्या भेटीचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात आ-ले आहे. या कृषी महोत्सवात शासनाच्या कृषी व कृषी संलग्न योजनांची आणि कृषी विद्यापीठाकडे अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवरावजी भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच कृषी सभापती श्रीमती अर्चना जीवतोडे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
याशिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा देखील सहभाग राहणार आहे. 11 ते 15 जानेवारी या दरम्यान शेती करणा-यांनी, शेतीशी नाळ जोडलेल्या प्रत्येक परिवाराने याठिकाणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.