औरंगाबाद येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आशीर्वचन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न
परभणी (प्रतिनिधी) :- वीरशैव लिंगायत हे आरक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह केंद्रातही वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, असे श्रीकाशीपीठ येथील श्रीश्रीश्री 1008 जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले.दरम्यान वीरशैव लिंगायत समाजाची जनगणना शासनाने करावी अशी मागणी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज यांनी केली.
शहरातील मुकुंदवाडी, एन-2 येथील ईडन गार्डन येथे रविवारी आयोजित आशीर्वचन व दर्शन सोहळ्यात धर्मसभेत ते बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल येथील श्रीश्रीश्री 1008 जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह श्री. ष. ब्र. 108 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य(अहमदपूर), वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य( साखरखेर्डा), रेणुक शिवाचार्य (मंद्रुप),शांतीवीरलिंग शिवाचार्य (औसा), राचलिंग शिवाचार्य (परंडकर),मनिकंठ गुरुसिद्ध शिवाचार्य (दहिवड), काशिनाथ शिवाचार्य (पाथरी बापू),डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य (मांजरसुंबा) आणि महाराष्ट्रातील शिवाचार्यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी खा. चंद्रकांत खैरे होते.
कार्यक्रमास उद्योजक सोमनाथअप्पा साखरे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सचिन खैरे, औरंगाबाद येथील प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, परळी वैजनाथ येथील श्रावणमास तपोनुष्ठाण सोहळयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे, आयोजक शिवा स्वामी किर्तनकार, श्रीराम बोंद्रे, बालू स्वामी गुंडेकर, महेश पाटील, बद्रीनाथ गंवडर, जगन्नाथ गुळवे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, शिवा खांडखुळे, विश्वनाथ स्वामी, सिचन संगशेट्टी,कर्नाटक संघ औरंगाबादचे अध्यक्ष एस. एल. रामलिंगप्पा, गुरुपादप्पा पडशेट्टी आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, लिंगायत हा धर्माचा संस्कार आहे, धर्म नव्हे. वीरशैव हा मूळ धर्म आहे. तर लिंगायत हे रुढीने आलेले आहे. त्यामुळे सरकारदरबारीदेखील लिंगायत लिहले जात आहे. डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, सर्व धर्मांचा मूळ हा वीरशैव धर्म आहे. शैव म्हणजे शिवाची आराधना करणारा आणि वीर म्हणजे विद्येत रमण करणारा होय. गळ्यात लिंग धारण केले पाहिजे. दररोज पूजन केले पाहिजे. लिंगालाच सर्वस्व मानणारे म्हणजे लिंगायत होय. अष्टावरण, पंचाचार्य आणि षटस्थळ यामुळे 856 हा वीरशैव लिंगायत धर्माचा कोड संख्या म्हणून समजले पाहिजे.
उज्जयनी येथील श्रीश्रीश्री 1008 जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी धर्मसभेत मोबाईलवरून संवाद साधला. ते म्हणाले,सध्या राजकीय लाभासाठी वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे आहेत, असे म्हटले जाते. परंतु दोन्ही एकच आहेत. वेगळे म्हणणाजयांक डे आकर्षीत होता कामा नये.