Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या:महापौर नंदा जिचकार

नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्मार्ट शहरातील प्रत्येक नागरी सुविधा स्मार्ट करण्यावर भर आहे. त्यादृष्टीने कार्य सुरू आहे. नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे. मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रीक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोयी संपूर्ण देशात फक्त नागपुरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु जोपर्यंत नागरिक या सुविधांचा लाभ घेणार नाही, तोपर्यंत याचा काही उपयोग नाही. नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.  
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड सिद्दिकी उपस्थित होते. 
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहर ‘विकासाचे मॉडेल’ म्हणून उदयास येत आहे. येथील प्रत्येक सोयी सुविधा स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकास,सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक उत्सव अशा विविध पैलूंअंतर्गत कार्य सुरू आहे. विविध योजनांचा लाभ येथील त्या-त्या घटकातील नागरिकांना मिळावा, यासाठी यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहे. या सर्व कार्यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी प्रत्येक योजनांत, उपक्रमांत सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन पथकाचे महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निरीक्षण केले. त्यानंतर परेडची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
प्रभाग १५ ला ५० लाखांचा पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डाची स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यात धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ ला ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १७ ला जाहीर झाला असून तो ३५ लाख रुपयांचा आहे. १५ लाख रुपयांचा तृतीय क्रमांक धंतोली झोनमधीलच प्रभाग क्र. ३३ व प्रभाग क्र. ३५ ला विभागून जाहीर करण्यात आला. 
फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, निगम सचिव हरिश दुबे, आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.