Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ०६, २०१८

युद्ध पातळीवर काम करत महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत

वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून 
माहिती देण्यात आली
नागपूर/प्रतिनिधी:

शुक्रवारी  पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे  नागपूर शहरातील अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला होता  .पावसाचा जोर कमी होताच वीज वाहिनी सुरक्षित  असल्याची खात्री झाल्यावर टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तर ग्रामीण भागातील खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणकडून युद्ध पातळीवर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
पहाटेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील खोलगट भागात पाणी जमा होऊ लागले. मोठ्या इमारतीतील तळ मजल्यावर वीज  मीटर  असलेल्या वीज ग्राहकांचे महावितरण कार्यालयात माहितीसाठी आणि वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यासाठी दूरध्वनी येऊ लागले. महावितरणचे शाखा अभियंता आणि जनमित्र वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जागोजागी धाव घेऊ लागले. भर पावसात महावितरणचे जनमित्र आपले कर्तव्य बजावत होते.
     मॉरिस कॉलेज टी  जवळील भोंडा मंदिराजवळ जुने झाड उन्मळून पडल्याने टेकडी लाईन आणि महाजन मार्केट परिसरास वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीचा पुरवठा दुपारी एक वाजता काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. कुही तालुक्यातील मळणी गावातील नाला पुराच्या पाण्यामुळे वाहू लागला यामुळे ३३/११ के. व्ही. डोंगरगाव उपकेंद्राकडे जाणारा मार्ग बंद झाला. परिणामी पुराचे पाणी ओसरल्यावर डोंगरगाव उपकेंद्रात जाऊन येथील बिघाड दुरुस्त करण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेसा बेलतरोडी उपकेंद्रात पाणी जमा झाले होते.
सीताबर्डी,सेंट्रल बाजार रोड रामदासपेठ, काँग्रेस नगर,शंकर नगर,अमरावती रॊड, अजनी चौक, रामदासपेठ,धरमपेठ परिसरातील अनेक इमारतीमधील तळ मजल्यावर पाणी पावसाचे पाणी शिरल्याने येथील वीज ग्राहकांनी वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यासाठी महावितरणच्या शाखा कार्यालयात फोन करून विनंती केली. हिंगणा परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुराचे पाणी वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाजनवाडी आणि हिंगणा परिसरातील काही भागाचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्रिमूर्तीनगर उपकेंद्रात पावसाचा जोर ओसरल्यावर पाहणी केली असता या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने या परिसरातील सुमारे ५ हजार वीज ग्राहकांचा बराच काळ बंद राहिला.
नागपूर शहरातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती वीज ग्राहकांना दुपारी १२ नंतर एसएमएसच्या माध्यमातून देण्यात आली. यात मुसळधार पावसामुळे आपला वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला असून पुराचे पाणी ओसरताच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल  असे यात नमूद करण्यात आले होते.
सावनेर आणि पाटणसावंगी परिसरास वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने येथील सुमारे ८ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी २ वाजता बंद झाला. महापारेषण कडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. कळमेश्वर-धापेवाडा,गोंडखैरी  वाहिनीवर वीज पडल्याने येथील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरु करण्यात आले . मौदा तालुक्यातील शिवानी आणि निंबा या  गावात नाग नदीच्या पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याने येथील वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी ३ वाजता बंद करण्यात आला. मुसळधार पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणकडून सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असून काही भागात रात्री उशिरा रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. अश्या प्रसंगी वीज ग्राहकांनी संयम ठेऊन महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.