Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ११, २०१८

चंद्रपूरच्या महिला बचत गटांचा राष्ट्रीय सन्मान

नवी दिल्ली/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील वैष्णवी महिला बचतगटाला ‘दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजिवीका मिशन’ अंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा संस्थेच्या ए.पी. शिंदे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘दिनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजिवीका मिशन’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणा-या देशभरातील महिला बचत गटांना वर्ष २०१७-१८ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव व मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील दोन महिला बचत गटांसह देशभरातील ३४ महिला बचतगटांना सन्मानीत करण्यात आले. 
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड ब्लॉक मधील चिंधीचूक गावातील वैष्णवी महिला बचतगटालाही यावेळी सन्मानीत करण्यात आले. २०१० मध्ये १२ सदस्य संख्येने सुरुवात झालेल्या या बचत गटाचा २०१४ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजिवीका मिशनमध्ये समावेश करण्यात आला व त्यांना ५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. दशसुत्रीचे पालन करत आठवडयाला बचतगटाची बैठक होते व प्रत्येक बैठकीची हजेरीपटावर नोंद घेतली जाते. यानुसार बैठकीस हजर राहण्याचे महिलांचे प्रमाण ९७ टक्के आहे. प्रति सदस्य प्रति महिना १०० रूपयांप्रमाणे या बचत गटाने जून २०१७ पर्यंत एकूण १ लाख ७६ हजार ८०० रूपयांचे भांडवल उभे केले आहे. बचत गटाच्या सदस्यांनी ३ लाख ७५ हजारांचे कर्ज घेतले व त्याची परतफेडही केली आहे.
या महिला बचत गटाच्या महिलांनी सेंद्रीय तांदूळ,डाळी,हळदी आणि मिर्ची पावडरचा व्यवसाय थाटला आहे. बचत गटाच्या प्रत्येक सदस्याला वर्षाकाठी ४० ते ४५ हजारांचे उत्पन्न मिळते. या मिळकतीच्या माध्यमातून या महिलांनी डेअरी,स्टेशनरी,भाजीपाला, कुक्कुट पालन, शिलाईकाम आदी स्वत:चे व्यवसायही सुरू केले आहेत. या बचत गटाच्या ७ महिलांना‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’(मनरेगा) अंतर्गत गुरांसाठी गोठा बांधून मिळाला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ९ महिलांना गॅस जोडणी मिळाली आहे. या बचतगटाच्या महिलांनी दारुबंदी रॅली मध्ये तसेच आरोग्य शिबीरांमध्ये सहभाग घेतला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ चा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
बीड जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले महिला बचत गट 
बीड जिल्हयातील शिरुर कसार ब्लॉक मधील वर्णी गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले. दिनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण आजिवीका मिशन अंतर्गत चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या बचत गटात एकूण १५ सदस्य असून या सर्व महिला मागास समाजातील आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजिवीका मिशन अंतर्गत या बचतगटाच्या सदस्यांना बचतगट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. दशसुत्रीच्या पायावर उभारणी झालेल्या या बचतगटाने आरोग्यसेवा, शिक्षण विषयक जागृती, शासकीय योजनेतील जनसहभाग आणि कायमस्वरूपी उदरनिर्वाह या विषयांवर कार्य केले. प्रति सदस्य प्रति महिना १०० रूपयांप्रमाणे या बचत गटाने जून २०१७ पर्यंत एकूण ६९ हजार ७५० रूपयांचे भांडवल उभे केले. बचतगटाने बँकेकडून ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले व त्याच्यावरील व्याजासह परतावा केला. बचतगटातील महिलांनी शिवन यंत्र खरेदी केले व त्या टेलरींगचे कार्य करीत आहेत. दोन महिलांनी पीठ गिरणी सुरु केली आहे. काही महिलांनी बचत गटाकडून कर्ज घेऊन ऑटो गॅरेज उभारले, काहींनी पानाचे दुकान, डेअरी, शेळी व मेंढी पालन सुरु केले आहे. वर्षाला या महिलांना ३६ ते ४८ हजार रूपये उत्पन्न मिळते. या महिलांचे जनधन योजनेंतर्गत स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले. बचत गटाच्या प्रत्येक महिलांच्या घरी शौचालय आहे. ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत’ या महिलांचा विमा उतरविण्यात आलेला आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.