Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून २६, २०१८

मंगलतोरण, औक्षण आणि गुलाबपुष्पाने झाले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा
 पहिल्याच दिवशी मिळाले गणवेश आणि पुस्तके
नागपूर/प्रतिनिधी:




मंगलतोरण आणि रांगोळ्यांनी सजलेली शाळा, शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी केलेले औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत अशा मंगल वातावरणात महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी शाळेत पहिले पाऊल ठेवले. पहिल्याच दिवशी मिळालेले गणवेश आणि पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत उपस्थित पाहुण्यांचे आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. 
निमित्त होते शाळेतील पहिल्या दिवसाचे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा मंगळवारपासून (ता. २६) सुरू झाल्या. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत करून ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सवाचा मुख्य कार्यक्रम विवेकानंद उच्च प्राथमिक हिंदी शाळेत झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार, नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, मुख्याध्यापिका संध्या इंगळे, रजनी वाघाडे, शिक्षण विभागाचे संजय नंदनकर, नाना सातपुते, शिक्षक पालक समितीचे शामकुमार शिव, डी.के. साहू, ओलावा संस्थेच्या मीरा कडबे उपस्थित होत्या. 
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, गणवेश आणि पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार नागो गाणार म्हणाले, मनपाच्या शाळेचा दर्जा आणि शिक्षण अतिशय चांगले आहे. आपण स्वत: मनपाच्या शाळेतून शिक्षण घेतले. याच शाळेने आपल्याला अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी लढण्याची शिकवण दिली. शिक्षणाने आपण चांगले व्यक्ती बनतो. शिक्षण आपल्या चालण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून दिसायला हवा. शिक्षण घेऊनही जो व्यक्ती भ्रष्टाचार करतो, त्याच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. अशा व्यक्तींवर संस्कार झालेले नसतात. मनपाच्या शाळेत शिक्षणासोबतच संस्कार होतात, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. 
शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. यावर्षी मनपाच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांना जसे पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तके मिळाली तसेच पुढील काही काळात हिवाळा येण्यापूर्वी स्वेटर उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने आणि शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका संध्या इंगळे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश आणि पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण समितीचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार मानले. संचालन अंजली कावळे यांनी केले. आभार श्री. बरडे यांनी मानले. 
विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दहावीत ८८ टक्के गुण मिळविणारी कु. बिस्वनी धुर्वे, ८४ टक्के गुण मिळविणारा कमलेश वर्मा आणि ८१ टक्के गुण प्राप्त करणारा संदीप साहू यांचा सत्कार करण्यात आला. प्रो-कबड्डीमध्ये नागपूरचे नेतृत्त्व करणारा हेमलाल साहू आणि कराटे स्पर्धेत राज्य स्तरावर खेळणारा दिलीप कावरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 
वेदशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश
नरेंद्र नगर येथील वैदिक अनुसंधान संस्थेत वेद शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना यावेळी प्रथमच पाचवी ते नवव्या वर्गात प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या वेळी या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार केला. या सर्व विद्यार्थ्यांचेही यावेळी मान्यवरांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. 
विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन
विवेकानंद नगर शाळेत यावेळी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. विद्या प्राधिकरण योजनेअंतर्गत ही प्रयोगशाळा मंजूर असून हसत खेळत विज्ञानाचे शिक्षण या प्रयोगशाळेतून मिळणार आहे. 
आमदार सोले, स्थायी समिती सभापती कुकरेजांनी केले स्वागत
नागपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांत लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लालबहादूर शास्त्री माध्यमिक शाळेत आमदार प्रा. अनिल सोले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणवेश आणि पुस्तक वाटप केले. एम. ए. के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेत स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा नेताजी मार्केट माध्यमिक शाळेत स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत गणवेश आणि पुस्तक वाटप केले तसेच पुढील शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. 
राम मनोहर लोहिया शाळेत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत 
महानगरपालिकेच्या टेलिफोन एक्सचेंज जवळील डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय रामपेठ येथे शाळा प्रवेशोत्सवाच्या शुभारंभला प्रमुख पाहुणे कार्यकारी महापौर तथा उपमहापौर दीपराज पार्डीकर होते.यावेळी गांधी महाल झोन सभापती वंदना यंगटवार, शाळेचे मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा, पर्यवेक्षक मंगला भुरे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, विद्यार्थी-पालक मोहन मिश्रा, शिक्षक रवी खंडाईत, वंदना कोल्हे, डॉ. राजहंस वंजारी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येकी ५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेश, पुस्तके, परीक्षेचा खरडा व सायकल वाटप करण्यात आले. तसेच शाळेतून दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक ७७ टक्के गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी मोनिका भगत हिचा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करतांना उपमहापौरांनी म.न.पा. शाळेचा विद्यार्थी गुणवत्तेत कुठेही कमी नाही. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाऊन मोठे यश संपादन करावे, असे आवाहन केले. यावेळी झोन सभापती वंदना यंगटवार व मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा अचकरपोहरे तर आभार गीता दांडेकर यांनी मानले.
संजयनगर शाळेत प्रवेशोत्सव साजरा
नागपूर महानगरपालिकेच्या डिप्टी सिग्नल येथील संजयनगर शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक अनिल गेंडरे, नगरसेविका सरिता कावरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.